मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आरोपीला दयामाया दाखवणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. पुन्हा असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा बनवू. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांनी शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे.
'पीडितेच्या हत्येनंतर आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार आहे. सगळ्यांनी थोडं धीर धरा. सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. पण कृपा करुन वेड्यावाकड्या घटना होऊ देऊ नका. महाराष्ट्रात अशा घटनांना आणि घटना घडवणाऱ्यांना अजिबात थारा नाही. दया, माया, क्षमा देखील हा महाराष्ट्र दाखवणार नाही. याचा पाठपुरावा करुन लवकरात लवकर गुन्हा दाखल करुन आरोपीला फासावर लटकवू असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'नुसतं हैदारबाद सारखा कायदा म्हणून नाही तर तो कायदा नेमका काय आहे. त्यात आणखी काही सुधारणा करुन कडक कायदा करु. जेणेकरुन असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा महाराष्ट्र सरकार करेल.' असं ही मुख्यंमत्र्यांनी म्हटलं आहे.