Mumbai Crime News Today: महाराष्ट्रातील ठाणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. 27 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार करुन तिला ब्लॅकमेल करुन लग्न करण्यास भाग पाडले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे 38 वर्षीय आरोपी आणि त्याच्या आईच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर आरोपी तिला सिगारेटचे चटके किंवा गरम तव्याचे चटकेदेखील देत होता. चार वर्षांपूर्वी पीडिता आणि आरोपीची मैत्री झाली होती. त्यानंतर या सगळ्या घटना घडण्यास सुरुवात झाली होती. पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीवरुन 38 वर्षीय व्यक्तीवर आणि त्याच्या आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर येथील रहिवासी 2021मध्ये फेसबुकच्या माध्यमातून पीडितेच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपी पीडितेला घेऊन लॉजमध्ये गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओदेखील बनवले. तसंच, हे व्हिडिओ दाखवून आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसंच, आरोपीने पिडीतेला तिच्यासोबत लग्न करण्यास जबरदस्ती केली .
लग्नानंतर आरोपी पीडितेला घेऊन मध्य प्रदेशच्या ग्वालिअरला घेऊन गेला. तिथे गेल्यावर त्यांनी तिचे केस व भुवया कापल्या आणि एका घरात तिला बांधून ठेवले. पोलिसांनी म्हटलं की, आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटके दिले तर आरोपीच्या आईने तिला गरम तव्याने मारहाण केली. त्यानंतर ती गंभीर जखमी झाली होती.
आरोपीने पीडितेचे आधार कार्ड, पॅन कार्डसोबतच बँकेचे पासबुक घेतले होते. तसंच, या कागदपत्रांचा दुरुपयोग करुन बँकेकडून कर्जदेखील काढले होते. तसंच, पीडितेला धमकी दिली की, जर घरी कोणाला याबाबत काही सांगितले तर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करेन, त्यामुळं ती इतके वर्ष गप्प बसले.
महिलेने रविवारी पोलिसांत जाऊन तक्रार दिली. त्या आधारे आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात आत्तापर्यंत कोणालाच अटक करण्यात आलेली नाही.