Mumbai Hanging Gardens: मुंबईतील उच्चभ्रू परिसरात असलेले हँगिग गार्डन हे बच्चे कंपनीचे आवडचे ठिकाण आहे. मलबार हिलमध्ये 4 हजार चौरस फुटाच्या परिसरात हे गार्डन असून त्यातील म्हातारीचा बूट हा लहान मुलांपाठोपाठ पर्यटकांचेही आकर्षण आहे. हँगिग गार्डनमधून मुंबईचा विलोभनीय नजारा दिसतो. मुंबईतील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून त्याला 136 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, आता तब्बल ७ वर्षांसाठी गार्डन बंद होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेने शहरातील पायाभूत सुविधा हाती घेतल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे गार्डन बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मलबार हिलवरील टेरेस गार्डन म्हणजेच हँगिग गार्डनच्या खाली असलेल्या वसाहतकालीन जलाशयाची पुनर्बांधणी करण्याची योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मलाबार हिल जलाशयाची दुरुस्ती आणि विस्तारासाठी हँगिग गार्डनमध्ये खोदकाम करण्यात येणार आहे. परंतु, पाणी साठवण्यासाठी जवळपास 90 दक्षलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधून पर्यायी मार्ग सापडत नाही तोपर्यंत काम सुरू करण्यात येणार नाही, असं पालिकेने म्हटलं आहे.
येत्या सात वर्षांच्या कालावधीत जलायश पाडून पुनर्बांधणी करण्याची योजना आहे, अशी माहिती महापालिकेची अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी दिली. काम सुरू करण्याआधी लगतच्या भूखंडावरील सुमारे 350 झाडे तोडणे आणि पुनर्रोपण करण्याव्यतिरिक्त संपूर्ण लँडस्केप क्षेत्र वेगळे करणे आवश्यक आहे, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बीएमसीच्या जल बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर सर्व परवानग्या मिळाल्या तर नोव्हेंबर 2023 पर्यंत काम सुरू करण्यात येईल.
दरम्यान, मलबार हिल जलाशय हे फिरोजशहा मेहता उद्यान (हँगिंग गार्डन) परिसरात असून, त्यातून ग्रँट रोड, ताडदेव, गिरगाव, चंदनवाडी, मंत्रालय, चर्चगेट, सीएसएमटी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. सन १८८७मध्ये बांधलेल्या व सव्वा शतकाहून अधिक काळ सेवा बजावलेल्या या जलाशयाच्या पुनर्बांधणीचा निर्णय पालिकेने घेतला आहे. एकूण पाच टप्प्यांत हे काम केले जाणार आहे.
सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. या जलाशयामुळे दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.