Mira Road Murder Case: मिरारोड परिसरात श्रद्धा वालकर हत्याकांडाची (Shraddha Walkar Case) पुनरावृत्ती घडली आहे. लिव्ह-इनमध्ये (Live In RelationShip Case) राहणाऱ्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीचा निर्घृणपणे खून करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपीचे नाव मनोज साने (Manoj Sane) असं आहे. तर, मृत तरुणीचे नाव सरस्वती वैद्य (Saraswati vaidya) असं आहे.
मिरारोड परिसरातील आकाश दीप सोसायटीमध्ये ते राहत होते. गेल्या तीन वर्षांपासून मनोज आणि सरस्वती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपासून शेजाऱ्यांना मनोज यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. या वासामुळं हैराण झालेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस तिथे पोहोचले व त्यांनी मनोजच्या घराचे दार ठोठावले. दार उघडताच तीव्र दुर्गंध पसरली.
पोलिसांनी घराची झडती घेताच त्यांना सरस्वती यांचा मृतदेह सापडला. सरस्वतीच्या धडाचा भाग गायब होता. फक्त पायच पोलिसांना सापडले. तीन ते चार दिवसांपूर्वी तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मनोजला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, या सगळ्या घटनेवर शेजाऱ्यांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे.
मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाचे शंभर तुकडे केले असल्याचा दावा शेजारी राहणाऱ्यांनी केला आहे. मनोजच्या घरातून खूप दुर्गंधी येत होती. आम्हाला आधी वाटलं की एखादा उंदीर मेला आहे का? म्हणून आम्ही संपूर्ण मजल्याची स्वच्छता केली. मात्र, तरीही दुर्गंधी कमी झाली नाही. उलट दिवसेंदिवस दुर्गंधी वाढतच होती. म्हणून आम्ही पोलिसांनी याबाबत माहिती दिली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.
पोलिस आल्यानंतर दरवाजा उघडताच आम्हाला हॉलमध्ये लादी कापण्याचा एक कटर दिसला. तर आत बेडरुममध्ये पॉलीथीन अंथरले होते आणि त्यावर मोठा करवत होता. किचनमध्ये गेल्यावर दोन बादल्या आणि एक पातेले होते. या दोन्ही बादल्यांमध्ये काळं काळं रक्त होतं. मासं आणि हाडांनी बादल्या भरल्या होत्या, अशी अंगावर काटा आणणारी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.
आरोपी मनोजबद्दल सांगताना शेजाऱ्यांनी म्हटलं की, सरस्वतीच्या हत्येनंतर बाहेर जाताना तो बॅग, हेल्मेट आणि मास्क घालून बाहेर जात होता, अशी माहिती दिली.
दरम्यान, आरोपी मनोज आणि मयत तरुणी सरस्वती यांचे कधीच कोणाशी संभाषण नव्हते. आम्हाला तर त्यांचे नावदेखील माहिती नव्हते. कधीतरी सरस्वती दिसली तर ती फक्त हसायची. पण मनोजचे वागणं विक्षिप्तचं असायचं, असंही शेजाऱ्यांनी म्हटलं आहे.