राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर विमानतळावरुन तस्करीचा प्रयत्न कस्टम विभागाने हाणून पाडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळजवळ सव्वा किलो सोन्याची तस्करी अंतर्वस्त्रामध्ये लपवून केली जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये १ किलो २३६ ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. मुंबईहून नागपूरला आलेल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची झडती घेतली असता हा सारा प्रकार समोर आला. तस्करी करणाऱ्या व्यक्तीला कस्टम विभागाने ताब्यात घेतलं आहे. संबंधित व्यक्तीबद्दल कस्टम अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याला थांबवून तपासणी करण्यात आली असता अंतर्वस्त्रातून सोन्याची तस्करी केली जात असल्याचं उघड झालं. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची एकूण किंमत ६८ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.
'गो फर्स्ट'च्या विमान क्रमांक जी८-०२६०१ विमानाने हा आरोपी प्रवास करुन मुंबईवरुन नागपूरमध्ये आला होता. अशाप्रकारे घरगुती उड्डाणादरम्यान सोन्याची तस्करी होण्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान, आज सकाळीच मुंबई विमानतळावर कस्टम अधिका-यांनी २८ कोटी १० लाखांचं कोकेन जप्त केलं. एका भारतीयाला दोन किलो ८१ ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात आली. हनीट्रॅपमध्ये अडकवून सदर आरोपीला तस्करी करण्यासाठी भाग पाडल्याचं तपासात समोर आलं आहे. या आरोपीची अन्य एका व्यक्तीबरोबर सोशल मीडियावर भेट झाली होती. त्यानंतर त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवत तस्करी करायला लावली अशी माहिती कस्टम विभागानं दिली आहे. या प्रवाशाने डफल बॅगमध्ये कोकेन लपवून आणलं होतं.