'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार

Nagpur Crime News: नागपूरमध्ये कुख्यात आरोपीला पुष्पा 2 चित्रपट पाहताना पचपावली पोलीसांनी अटक केली आहे. 

अमर काणे | Updated: Dec 24, 2024, 12:50 PM IST
'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार title=
nagpur crime news Accused watching Pushpa2 police caught him at cinema hall

Nagpur Crime News: पुष्पा 2 हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळं चर्चेत आहे. दक्षिणेकडे हा सिनेमा वादातदेखील सापडला होता. मात्र, महाराष्ट्रात चक्क या सिनेमामुळं एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. हत्या आणि अमली पदार्थाच्या प्रकरणात आरोपीला नागपुर पोलिसांनी पुष्पा-2 बघताना अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिनेमागृहात चित्रपटाचे स्क्रिनींग सुरु असतानाच पोलिसांनी आरोपी विशाल मेश्राम याला अटक केली. पोलिसांची ही कारवाई सुरू असताना प्रेक्षकांमध्येही एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर प्रेक्षकांना अश्वस्त केलं की ते आता चित्रपटाचा आनंद आधीसारखाच घेऊ शकतात. 

आरोपी विश्वास मेश्राम असं या आरोपीचे नाव असून तो 10 महिन्यांपासून फरार होता. नागपूर येथील पाचपावली पोलिसानी त्याला  पुष्पा 2 चित्रपट पाहताना अटक केली. विशाल हा साथीदारां सोबत पुष्पा -2 चित्रपट पाहण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुद्धा पुष्पा 2 चित्रपट तिकीट खरेदी केली. तो बसलेल्या सीटच्या मागील बाजूस पोलीस बसून राहिले होते. 

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपी आत सिनेमागृहात असताना बाहेरही पोलिसांचे एक पथक तैनात होते. आतापर्यंतच्या त्याच्या पार्श्वभूमी पाहता तो पोलिसांवर हल्ला करतो, अशी माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळं पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या वाहनाची चित्रपट सुरू असतानाच हवा काढून ठेवली होती. जेणेकरुन तो पुन्हा पोलिसांच्या हातातून निसटू नये. 

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर कारवाई करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 2012 पासून विशाल मेश्राम हा गुन्हेगारी क्षेत्रात वावरत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 27 गुन्हे दाखल आहे. 302, जबरी चोरी, डकेती, तडीपार, मोका, सुद्धा लावण्यात आला आहे. अमली पदार्थ संबंधीदेखील गुन्हे दाखल आहेत.