उर्वशी खोना, झी मीडिया
Nana Patole: एकीकडे महायुतीकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. तर एकीकडे काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यता आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून पटोले राजीनामा देऊ शकतात. त्याआधी ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडादेखील पार करता आला नाहीये. काँग्रेसला राज्यात फक्त 15 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात गोंदिया, अमरावती, वर्धा व बुलढाणा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निसटता विजय मिळाला. अनेक दिग्गज पराभूत झाले. या विधानसभेत महाविकास आघाडीची अवस्था बिकट झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर नाना पटोले मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची भूमिका मांडणार. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंकडे आपला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजतेय.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांना निसटता विजय मिळवला आला आहे. नाना पटोले व भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. अखेर या चुरशीच्या लढतीत नाना पटोले यांनी अवघ्या 212 मतांनी विजय मिळवला आहे.
महायुतीने राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये 288 जागांपैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. तर महाविकास आघाडीने 45 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला 20 जागा, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाला 10 जागांवर विजय मिळवता आला आहे.