सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : आधार कार्ड (Aadhar Card) हे प्रत्येकाच्या जीवनातील अत्यावश्यक कागदपत्र. बँकेत खातं उघडायचं असो की महत्त्वाची कागदपत्र मिळवायची असोत, आधारकार्ड लागतंच. त्यामुळे आधारकार्डवर आपलं नाव, जन्मतारीख, पत्ता याची योग्य आणि अचूक माहिती असणं गरजेचं असतं. यात एखादी जरी चूक असेल तरी ती तात्काळ अपडेट (Aadhar Update) करुन घेणंही तितकच गरजेचं. पण नविन आधारकार्ड बनवायचं असेल किंव त्यात माहिती अपडेट करायची असेल तर सरकारी मान्यता असलेल्या केंद्रावरच ती अपडेट करा. यासंदर्भात सरकारकडून वारंवार आवाहनही केलं जातं. कारण भामट्यांकडून याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. फसवणूकीची अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
नाशिकमध्ये 'जमताडा'
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जमताडा (Jamtara) नावाची एक मालिका प्रदर्शित झाली होती. यात भोळ्या भाबड्या ग्रामस्थांची फसणूक (Fraud) करुन त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करुन मोबाईल सिमकार्ड मिळवले जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. काहीशी अशीच पद्धत वापरुन नाशिकमध्ये लोकांना फसवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधल्या या भामट्यांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. आरोपींनी आधारकार्ड संबधित शिबीर भरवून नागरिकांच्या हाताचे ठसे घेतले आणि बँक खात्यातील रक्कम काढून मौजमजा केली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलीय.
कोण आहेत हे भामटे...
किशोर लक्ष्मण सोनवणे, रवींद्र विजय गोपाळ, सोमनाथ काकासाहेब भोंगाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून ते चाळीसगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावात राहतात. यातील किशोर हा धुळ्यातील इंजिनीअरिंग महाविद्यालायत शिक्षण घेत आहे. रवींद्र आणि सोमनाथ चाळीसगाव इथं काम करतात. अधिकचा पैसा कमवण्यासाठी या तिघांनी मिळून फिरते आधार केंद्र सुरु केलं. गावोगावी जाऊन आधार अपडेट शिबीराचे आयोजन केलं जात होतं.
अशी सुचली युक्ती
बँक खातं उघडण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती आवश्यक असते. तसंच आधार अपडेट करण्यासाठी त्या व्यक्तीचा हाताचा ठसा घेतला जातो. पण या फिंगर प्रिंटचा वापर करून सीएसजी डिजी-पे ऑनलाइन मनी ट्रान्सफर्स सर्व्हिस अॅप’द्वारे पैसे ट्रान्स्फर करता येतात याची संपूर्ण माहिती या तिघांना घेतली. आणि या अॅपचा वापर करून पैसे कमवण्याची युक्ती या तिघांना सुचली.
अशी केली फसवणूक
फिरते आधार केंद्र या तिघांकडेकडे होतं. आरोपींनी जानेवारी महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पळशी आणि वेहेळगावात 'आधार' अपडेशन शिबिर भरवले होते. या शिबिरात गावातील जवळपास 200 नागरिकांनी आधार अपडेट केले. या सर्व नागरिकांचे बायोमॅट्रिक फिंगर आणि स्कॅनरद्वारे नागरिकांच्या बोटांच्या अंगठ्यांचे ठशे घेतले. त्याच डेटाचा वापर करून 'सीएसजी डिजी-पे ऑनलाइन मनी ट्रान्सफर्स सर्व्हिस अॅप'द्वारे आरोपींनी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढले.
असे झाले उघड
जानेवारी महिन्यात शिबीर घेतल्यानंतर हा सर्व डाटा गोळा करून आरोपी चाळीसगाव इथं गेले. यानंतर जवळपास 15 नागरिकांच्या बँक खात्यातून 2 लाख 66 हजार 799 रुपये काढण्यात आले. बँक खात्यातून पैसे काढल्याचा संदेश संबधित नागरिकांना आल्याने त्यांनी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. संशयित आरोपींकडून लॅपटॉप, मोबाइल, चार फिंगर स्कॅनर जप्त केले आहेत.