नाशिक : राज्यातला शेतकरी दुष्काळानं पिचलेला असताना त्याचा शेतमालही कवडीमोल दरानं विकला जातोय. कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय. काहींनी टोमॅटो फेकून शासनाचा निषेध केला.
सिद्धू घुले हे संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील शेतकरी. भयान दुष्काळी स्थितीतही अपार मेहनत घेत त्यांनी आपल्या शेतात कांदा पिकवला. मात्र ६५३ किलो कांदा विकून त्यांच्या पदरात केवळ ५० रूपये पडले. मातीमोल भावात विकलेल्या या कांद्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण पसलंय. तर दुसरीकडे मालेगावात टोमॅटोला अवघा ५० पैसे किलो भाव मिळाल्याने संतप्त शेतकर्याने टोमॅटो रस्त्यावर फेकला.
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डीचे तरुण शेतकरी योगेश ठाकरे यांनी वडनेरच्या आठवडे बाजारात टोमॅटोचे २० कॅरेटविक्रीसाठी आणले होते . मात्र त्यांना किलोला अवघा ५० पैसे दर मिळाल्याने संतप्त झालेल्या ठाकरे यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. आधीच शेतकरी दुष्काळात होरपळत आहे त्यातच शेतमालाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
आधीच दुष्काळाचे सावट आहे. कांदाच भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा असताना तसेच पाऊस न आल्याने विहिरी आटू लागल्या आहेत नवीन कांदा उत्पादन येईल याची शक्यता आता संपुष्टात आली आहे. दुष्काळाचे सावट घर करू लागल्याने पुढील पावसाळा येई पर्यंत पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा कसा मिळेल याची ही चिंता वाढली आहे.