नाशिक : भारतात कोरोना संकटात विचित्र प्रकरणे समोर येत आहेत. कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असूनही ते तोकडे पडत आहेत. नाशिकमध्ये काल झालेल्या ऑक्सिजन लीक नंतर आता आणखी एक हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर आली आहे.
नाशिकमधील पालिका रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची घटना घडून आतापर्यंत त्यातील 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी रुग्णालयात असणाऱ्यां लोकांमध्ये प्रचंड धावपळ दिसून आली. ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय बंद झाल्यानंतर अत्यंत भयावह परिस्थिती तयार झाली होती.
ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्यानंतर काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर इतर काही लोकांनी आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या खाटेजवळ असलेले ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पळ काढला.
लोकांना त्या एका तासात मरताना पाहणं भयावह होतं. गंभीर असलेल्या रुग्णांचे नातेवाईक मृत्यू झालेल्यांचे ऑक्सिजन सिलेंडर काढून आपल्या रुग्णाला लावत होते. ऑक्सिजन सप्लाय बंद झाल्यावर आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आजीची काळजी घेणाऱ्या विक्की जाधवनेही आजीसाठी एक ऑक्सिजन सिलेंडर आणला. परंतु तोपर्यंत आजीचा श्वास थांबला होता.