शरद पवारांना चंद्रकांत पाटील 'गॉडफादर' म्हणाले, पण या अर्थाने....

"शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर कंट्रोल आहे".   

Updated: Jun 3, 2021, 06:46 PM IST
शरद पवारांना चंद्रकांत पाटील 'गॉडफादर' म्हणाले, पण या अर्थाने.... title=

पुणे : शरद पवार (Sharad Pawar) सर्वांचे गॉडफादर आहेत. आमच्या सर्वांचे वैचारिक मार्गदर्शक आहेत. त्यांचा स्वत:च्या राष्ट्रवादी पक्षावर आणि सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) कंट्रोल आहे. यामुळे कोणत्याही निर्णयाचा दोष हा पवारांवरच जाणार, असा टोला भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation) सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) पवारांना जबाबदार धरलं होतं. मराठ्यांना पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही. सरकारला कोणालाही आरक्षण द्यायचं नाहीये, असा आरोप पडळकरांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं. पाटील पुण्यात (Pune) पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं. (ncp chief sharad pawar is godfather says State president chandrakant patil of bjp) 

चंद्रकात पाटील काय म्हणाले?

"शरद पवार सर्वांचे गॉडफादर आहेत. आमच्या सर्वांचे वैचारिक मार्गदर्शक आहेत. त्यांचा स्वत:च्या राष्ट्रवादी पक्षावर आणि सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीवर कंट्रोल आहे. तरी सुद्धा हे शक्य का होत नाही, असं म्हटल्यावर नेत्यावर दोष जातो. मराठा आरक्षणाबाबत माझी तयारी आहे. कॅमेरासमोर कागदपत्रांसह डिबेट करण्याची माझी तयारी आहे. आजच मी मराठीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा 700 पानी निकाल करुन घेतला. तो निकाल मी वाचूनच इथे आलोय. या निकालाच्या पानोपानावरुन किती दिरंगाई केली गेली आहे", असा आरोपही चंद्रकात पाटलांनी केला.

"ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात हेच झालं आहे. देवेंद्र फडणवीसांनी वटहुकूम काढून ओबीसीचं राजकीय आरक्षण तात्पुरतं टिकवलं अन सरकार गेलं. वटहुकूमाचा कायदा करुन तो टिकवायला हवा होता, पण सरकारने तसं केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आग्रह हा मागास आयोगाचा आहे. राजकीय आरक्षण का, यामागचा लॉजीक न्यायालयाला हवंय, पण ते दिलं जात नाही" असंही पाटील म्हणाले.

भेटींबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. तेव्हापासून राजकीय क्षेत्रात या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीबाबत चंद्रकात पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. "शरद पवार आजारी आहेत. अनेक जण त्यांची भेट घेऊन, त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहेत. आजारी असतानाही त्यांचं कामकाज सुरु आहे. पवार आजारी असल्याने फडणवीस त्यांची विचारपूस करायला गेले", असं पाटील यांनी नमूद केलं.

तसेच वादळामुळे जळगावमधील केळी उत्पादकांच नुकसान झालं. यावेळेस फडणवीस यांनी थेट त्या ठिकाणी जावून आढावा घेतला. यावेळेस फडणवीसांनी मुक्ताईनगरमधील नितळीतील एकनाथ खडसेंच्या घरीही गेले. यावेळेस खडसेंची भेट झाली नाही. मात्र भाजप खासदार आणि खडसेंची सून रक्षा खडसे यांची भेट झाली. या भेटीबाबतही चंद्रकात पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

नाथाभाऊ आमचे दुश्मन नाहीत. नाथाभाऊ आमचे पालक आहेत. आपले राजकीय विरोधक असले तरी त्या ठिकाणी गेलो की भेट द्यायची ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यातही त्यांच्या घरात भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे प्रामुख्याने फडणवीस रक्षा खडसेंना भेटायला गेले", असं पाटील म्हणाले. 

संबंधित बातम्या :

राज्यात 5 टप्प्यात अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

छत्रपती संभाजीराजे म्हणाले यंदा शिवराज्याभिषेक घरुनच साजरा करा, कारण की....