Sharad Pawar Announce Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. कुठे तरी थांबायचा विचार केला पाहिजे. जास्त मोह करणं योग्य नाही. मी तशी भूमिका घेणार नाही असं सांगत शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
गेली सहा दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेली 55 वर्षे शरद पवार हे राजकारणात सक्रिय होते. वयाच्या 83 व्या वर्षीही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह घेऊन शरद पवार हे राजकारणात सक्रिय होते. बारामती तालुक्यातील काटेवाडीपासून सुरु झालेला शरद पवारांचा राजकीय प्रवास हा दिल्लीपर्यंत पोहचला होता. अखेर मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. मात्र शरद पवार यांचा हा राजकीय प्रवास नक्की कसा होता? ते जाणून घेऊया...
27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश
बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये 12 डिसेंबर 1940 जन्मलेल्या शरद पवार यांनी वयाच्या 27 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. आई वडिलांकडून बाळकडू मिळाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदा 1967 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. बीबीसी मराठीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा हात धरुन शरद पवार राजकारणात आले होते. यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारच्या काळात शरद पवार मंत्रीही झाले होते. 1977 मधल्या आणीबाणीनंतर काँग्रेसचे दोन गट पडले. यशवंतराव चव्हाण यांच्यासह वसंतदादा पाटील, शरद पवार हे 'रेड्डी कॉंग्रेस'मध्ये गेले.
शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले
1978 मध्ये निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकदा एकत्र आले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. मात्र या सरकारमध्ये अनेक नेते अस्वस्थ होते यामध्ये शरद पवार देखील होते. त्यानंतर शरद पवार हे 40 समर्थांसह बाहेर पडले आणि आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै 1978 मध्ये 'पुरोगामी लोकशाही दलाचे' नेते म्हणून शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 38 व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याचा मान शरद पवार यांना मिळाला होता.
काँग्रेसमध्ये पुन्हा एन्ट्री
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्या हाती काँग्रेसची सत्ता आली. राजीव गांधी यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच काळात 1984 मध्ये शरद पवार हे बारामती मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. मात्र लगेचच ते दिल्लीतून परतले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. 1986 मध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला अन् 1988 मध्ये दुसऱ्यांदा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
त्यानंतर राजकीय कारकीर्दीच्या नव्या टप्प्यावर शरद पवार यांनी पुन्हा दिल्लीत जायचं ठरवलं. राजीव गांधी यांच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद प्रकरणानंतर मुंबईत मोठी हानी झाली. त्यामुळे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात आले तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना
सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणात यायचं ठरवलं अन् काँग्रेसमधल्या एका फळीला त्यांनी पंतप्रधान व्हावं असं वाटतं होते. मात्र 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून दुसऱ्यांदा बंड करत पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीनं 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'ची स्थापना केली. 1999 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले मात्र निकालानंतर ते पुन्हा एकत्र आले. मात्र राज्यात आघाडीचे अन् केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार आले. 2004 साली वायपेयी सरकार पायउतार झाले. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले आणि शरद पवार यांनी 10 वर्षे केंद्रीय कृषीमंत्रीपद स्विकारले.
महाविकास आघाडीची स्थापना
2019 मध्ये महाराष्ट्रात सत्तेचा मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर सत्तेची समीकरणं फिसकटली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
क्रिकेट विश्वातही मिळवली सत्ता
29 नोव्हेंबर 2005 मध्ये शरद पवार हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष झाले होते. तीन वर्षे त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली. 1 जुलै 2010 रोजी शरद पवार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही (ICC) अध्यक्ष होते. 2001 ते 2010 पर्यंत पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA)अध्यक्ष होते. तसेच शरद पवार यांना 2017 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे.