नवी दिल्ली: भाजप खासदारांनी निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांना उशीर झाल्याचे रडगाणे गाऊ नये, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ते बुधवारी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी सतत तक्रारीचा सूर लावणाऱ्या भाजप खासदारांना फैलावर घेतले. मतदारसंघात कामं झाली नसल्याचे रडगाणे बंद करा. त्याऐवजी जनतेसमोर सरकारच्या कामाबाबत सकारात्मक बोला. विरोधी पक्षात असतानाही कामं झाली नसल्याची रडगाणी असायची, आताही तुम्ही तेच करत आहात. मात्र, आपण विरोधी पक्षात नाही तर सत्तेत आहोत, याचे भान ठेवा, अशी तंबी गडकरी यांनी दिली.
तर दुसरीकडे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही भाजपच्या खासदारांना युतीच्या समीकरणाचा विचार न करता कामाला लागण्याचे आदेश दिले. सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घ्याव्यात. २५ जानेवारी पूर्वी ही बैठक घ्यावी. तसेच २०१९ ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही अमित शहा यांनी सांगितले.
भाजपच्या बैठकीत छत्रपती संभाजीराजे; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
दरम्यान, शिवसेनेशी काही गमावून युती करणार नाही, असा स्पष्ट पवित्राही अमित शहा यांनी घेतला. शिवसेना सोबत आहे का? यावर स्पष्टता आली तर कामाला लागता येईल' असा प्रश्न एका खासदाराने उपस्थित केला. त्यावर 'काहीही गमावून शिवसेने सोबत युती केली जाणार नाही. शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात भाजप सकारात्मक आहे. परंतु, भाजप काही गमावून युती करणारा नाही. तुम्ही सगळ्याच जागांवर कामाला लागा, असे उत्तर अमित शहा यांनी दिले.