आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब; सर्पदंशानंतर उपचार न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू

मारुती आडके घरात झोपले असताना साप त्यांना चावला.

Updated: Jun 10, 2019, 09:34 AM IST
आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब; सर्पदंशानंतर उपचार न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू title=

तुषार तापसे, झी २४ तास, सातारा : साताऱ्यातील मायणी येथे सर्पदंश झालेल्या एका वयोवृद्धाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा मोडकळीस आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ग्रामीण भागात असलेली  प्राथमिक आरोग्य यंत्रणा हीच स्वतः व्हेंटिलेटर वर असल्याचे चित्र समोर आले आहे. या ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने तात्काळ आवश्यक असणारे उपचार लोकांना मिळत नाहीत पर्यायाने लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे . 
 
काल (रविवारी) खटाव तालुक्यातील अनफळे या गावातील मारुती आडके या ७० वर्षाच्या वयोवृद्धास सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने आपला जीव गमावाला लागला. मारुती आडके घरात झोपले असताना साप त्यांना चावला. यानंतर त्यांना कुटुंबीयांनी तात्काळ मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र, याठिकाणी डॉक्टरच हजर नव्हेत. तब्बल तासभर वाट बघूनही डॉक्टर आलेच नाहीत. यानंतर मारुती आडके यांना वडूज येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्याठिकाणीही डॉक्टर नसल्याने अखेर आडके यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाल्याने मारुती आडके यांचा मृत्यू झाला. 

यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मारुती आडके यांचा मृतदेह मायणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला. दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही आणि मायणी आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी डॉक्टर देण्याची मागणी मान्य होणार नाही, तोपर्यंत मृतदेह आरोग्य केंद्रातून न हटवण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सगळ्या प्रकाराची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी विनीत फाळके यांना मिळाल्यानंतर ते या आरोग्य केंद्रात पोहचले आणि त्यांनी घडलेल्या घटनेबाबत चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात ७० ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती दिली. याबाबत आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करत असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.