औषधांच्या ऑनलाईन विक्रीत ड्रग्ज, गर्भपाताच्या गोळ्या टॉपवर

ऑनलाईन औषध विक्री बंद झाल्यानंतर या मागणीचा पुरवठ्यासाठी इतर अनधिकृत मार्गांचा वापर होण्याचीही शक्य

Updated: Dec 28, 2019, 04:46 PM IST
औषधांच्या ऑनलाईन विक्रीत ड्रग्ज, गर्भपाताच्या गोळ्या टॉपवर title=

अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : हल्ली सारं काही ऑनलाईन मिळत असताना औषधांची ऑनलाईन विक्रीदेखील तेजीत आहे. मात्र या पुढच्या काळात औषधांची ऑनलाईन खरेदी -विक्री थांबवावी लागणार आहे. दिल्ली उच्च नयायलायाच्या आदेशानंतर पुण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर कारवाई सुरु करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे, ऑनलाईन औषध विक्रीमध्ये नशेच्या गोळ्या तसंच गर्भपाताच्या किट्सना अधिक मागणी आहे. हा प्रकार केवळ अनधिकृत नसून असुरक्षितही आहे. आता ऑनलाईन औषध विक्री बंद झाल्यानंतर या मागणीचा पुरवठ्यासाठी इतर अनधिकृत मार्गांचा वापर होण्याचीही शक्यता आहे. 

नुकतीच पुण्यातील 'प्लॅनेट फार्मा' या औषध विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आलीय. औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्या कारणानं अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली. दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालानंतर उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त एस बी पाटील यांनी दिलीय.

सध्या इंटरनेटवर ऑनलाईन औषध विक्रीचा अक्षरशः बाजार झालाय. ग्राहकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र ऑनलाईन औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नाही. ग्राहकाला बनावट तसंच कमी गुणवत्तेची औषधं विकली गेल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर औषधांच्या ऑनलाईन विक्रीला अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलीय. 

औषधांची ऑनलाईन विक्री बंद करावी अशी औषध दुकानदारांची फार पूर्वीपासूनची मागणी होती, असं केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे खजिनदार रोहित करपे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनीही या कारवाईचं स्वागत केलंय.

एफडीएनं हाती घेतलेली ही कारवाई कितपत प्रभावी ठरते, हे लवकरच स्पष्ट होईल.