मुंबई : फ्लिफकार्ट सारख्या ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही आम्ही अनेकदा खरेदी केली असेल, मात्र याच पोर्टलवरून चक्क तलवारी, चाकू अशा धोकादायक शस्त्रांची विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांच्या सतर्कतेने हा सगळा साठा जप्त करण्यात आला आहे.
कागदामध्ये गुंडाळण्यात आलेल्या या 12 तलवारी, 13 मोठे चाकू, जांबिया, गुप्ती आणि कुकरी.... औरंगाबादमधून हा मोठा शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी शस्त्रं फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग पोर्टवरुन मागवण्यात आली होती. शोभेच्या वस्तू म्हणून तलवार, गुप्ती, जांबिया, अशी धारदार आणि धोकादायक शस्त्र सहजपणे मागवता येतात. याच माध्यमातून शहरात शस्त्रांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
भारतीय कायद्यानुसार अशी शस्त्रं मागवता येत नाहीत, शोभेसाठी विकता येतात, मात्र त्याचाही परवाना काढावा लागतो, मात्र नियमांची पायमल्ली करत औरंगाबादमधल्या तब्बल 24 लोकांनी ही शस्त्र मागवली होती, त्यात 12 तलवारी 13 मोठे चाकू, जांबिया, गुप्ती, कुकरी अशी धोकादायक शस्त्रं होती, शहरात दोन ठिकाणी एका कुरीयर कंपनीत ही शस्त्रास्त्र आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी या कुरीअर कंपनीवर छापा टाकला आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक करण्यात आलीय. ही शस्त्रं कशासाठी मागवण्यात आली होती, त्याची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये नुकत्याच भडकलेल्या दंगलीआधीही अशा प्रकारे शस्त्रं मागवण्यात आली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी फ्लिपकार्टचीही चौकशी होणार आहे. औरंगाबादमध्ये नुकतीच दंगल शमली आहे, आता कुठं शहर पुर्वपदावर येत आहे, त्यातच अशा पद्धतीनं शस्त्रसाठा सापडणं निश्चितच धक्कादायक आहे. आणि त्याहूनही महत्त्व ाचं म्हणजे घरबसल्या अशी शस्त्रं मिळत असतील तर ते अत्यंच धोकादायक आहे.