कैलास पुरी, झी २४ तास, पिंपरी-चिंचवड : महापौरपदाच्या सोडतीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे पद महिला खुल्या वर्गासाठी आरक्षित होताच पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर पदासाठी संघर्ष सुरु झालाय. अनेक महिला नगरसेवकांनी या पदासाठी इच्छा व्यक्त केल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजपसाठी महापौरपदाच्या निवडीची मोठी डोकेदुखी निर्माण झालीय.
पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय. सत्ताधारी भाजपमधल्या जवळपास २१ महिला या पदासाठी पात्र आहेत. त्यात अनेक ज्येष्ठ महिला नगरसेविकाचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
अनेक नगरसेवकांच्या समर्थकांनी आगामी महापौर म्हणून समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय. माई ढोरे, झामाबाई बारणे यांची नावे आघाडीला आहेत. सुजाता पालांडे यांचेही नाव या पदासाठी पुढं आलंय. या व्यतिरिक्त काही जण इच्छूक आहेत पण आताच पुढे येऊन पत्ता कट व्हायला नको, या भीतीने या नगरसेविका अजून इच्छा व्यक्त करत नाहीत.
एकीकडे महिला नगरसेविका महापौर पदासाठी इच्छूक असताना आपल्याच गटाचा महापौर बसावा यासाठी आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटात ही रस्सीखेच सुरू आहे. यापूर्वीही या दोन्ही गटात सत्ता आल्यापासून महापौर आपलाच राहावा, यासाठीचा संघर्ष दोन वेळा पाहायला मिळालाय. पण शहराध्यक्ष असल्याने लक्ष्मण जगताप यांनी बाजू सावरत महापौर गटाचा नाही तर भाजपचा होईल असं स्पष्ट केलंय. भाजप सत्तेत आल्यापासून दोन वेळा महापौर निवड करण्यात आली. दोन्ही वेळी कमालीची गुप्तता पाळत अगदी शेवटच्या क्षणी नाव जाहीर करण्यात आले. आता तिसऱ्यांदा भाजपकडून ही निवड केली जाणार आहे. तो संघर्ष कसा दूर केला जातोय, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.