बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुमारे साडेचरहजार कोटींचा हा घोटाळा असून अरोपीं कडून जप्त केलेल्या कागदपत्रांतून वेगवेगळी माहिती समोर येत आहे एचडीआयएल कंपनीच्या नावाखाली वाधवा पितापुत्रांनी पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेकडून तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज न फेडल्यामुळे कर्जावर दोन हजार कोटी रुपयांचे व्याज होत साडेचार हजारांचा हा घोटाळा समोर आला.
हे कर्ज मिळाल्यानंतर ते वाधवा पिता-पुत्रांनी आपल्या वेगवेगळ्या नावावर असलेल्या खात्यांमध्ये पैसे वळते करून मिळालेल्या पैशांमधून संपत्ती विकत घेतल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. कर्ज स्वरूपात मिळालेले पैसे कुठल्या मार्गाने इतर खात्यामध्ये वळविण्यात आले होते. याचा तपास फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टच्या मिळालेल्या अहवालानंतर स्पष्ट होईल अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
आर्थिक गुन्हे शाखेकडून वाधवा पिता-पुत्रांनी विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये विमान आलिशान गाड्या वसई अलिबाग येथील अलिशान बंगले आणि मुंबईत असलेल्या संपत्तीचा समावेश आहे.
अटकेत असलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक वारीयम सिंग आणि एमडी जॉय थॉमस यांच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या कागदपत्रांची सध्या छाननी सुरू असून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट अहवालासाठी ही कागदपत्रे पाठवलेली आहेत.