प्रशांत परदेशी, धुळे : धुळे महापालिकेच्या निवडणुकांची अर्ज माघारीची मुदत अजून संपलेली नाही त्याआधीच निवडणुकीचा प्रचार हा शिखरावर पोहचला आहे. निवडणुकांचा सर्वाधिक प्रचार होत असेल तर तो सोशल मीडियावर. राजकीय पक्ष, त्यांचे कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार हे आपणच कसे योग्य आहोत हे मतदारांना पटवून देण्याचा उद्योग सोशल मीडियावर जोरात करीत आहेत.
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत २६ तारखेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात किती आणि कोण उमेदवार आहेत हे स्पष्ट होणार आहे. मात्र अर्ज माघारीची प्रक्रिया संपण्याआधीच उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर प्रचाराची आघाडी घेतली आहे. या सोशल मीडियाच्या प्रचारात स्वतःची ब्रॅण्डिंग करण्याचा जसा प्रयत्न सुरु आहे तसाच तो विरोधी उमेदवारांची प्रतिमा हननाचाही सुरु आहे.
सोशल मीडियाचे आव्हान पेलण्यासाठी राजकीय पक्षांनी स्वतःची वॉर रूम तयार केली आहे. हा प्रचार सांभाळत असताना राजकीय पक्षांना सोशल मीडियावर अजून एका हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. स्वपक्षातील निष्ठावंताना पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी आपले विचार याच माध्यमाचा वापर करून व्हायरल केले आहेत. एकंदरीत समाजमाध्यमानी प्रचाराची संधी निर्माण करून दिली आहे तशी अपप्रचाराची भीतीसुद्धा निर्माण केली आहे. या समाजमाध्यमानच्या प्रचारावर जो विजय मिळवेल त्याला निवडणुकीतही लाभ होणार आहे.