Load Shedding in Maharashtra : राज्यात कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागत असताना महाविकास आघाडी सरकारच्या मदतीला छत्तीसगडची काँग्रेस सरकार आली असून छत्तीसगडमधील कोळस्याची एक खाणचं महाविकास आघाडी सरकार ऊर्जा विभागासाठी घेण्याचा प्रयत्न असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देखील तश्या सूचना छत्तीसगडच्या काँग्रेसच्या सरकारला केल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे तर्फे पुण्यातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांच्या गौरव सोहळ्याचे पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आदी उपस्थित होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काही प्रमाणात परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय
राज्यात लोडशेडिंग जरी चालू असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्थरावर एक बैठक घेण्यात आली आहे. त्यात दर आठवड्याला ऊर्जा विभागाची माहिती घेऊन देशात कुठं वीज उपलब्ध आहे. याबाबत माहिती घेतली जाणार आहे. लोडशेडिंग न ठेवता सुरळीत वीज पुरवठा कसा देता येईल यासाठी प्रयत्न केलं जाणार आहे. पण देशातील अनेक राज्यात कोळसा बाबत जेवढा पुरवठा व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये. म्हणून काही प्रमाणात परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
नवीन वर्षात ते पैसे खर्च करू शकतात
लोकसभेत बसणाऱ्या राज्यातील 48 खासदारांनी 2019 ते आतापर्यंत अवघा 45.38% स्थानिक विकास निधी खर्च केला आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की कोरोनाच्या काळात खासदारांना निधी द्यायच बंद करण्यात आलं होतं. नंतर त्याला सुरवात झाली. जो काही खासदारांचा निधी आहे तो ल्याप्स होत नाही. नवीन वर्षात ते पैसे खर्च करू शकतात.असं देखील यावेळी पवार म्हणाले.
पोलिसांच्या बदलीचा अधिकार
बदल्यांच्या संदर्भात पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मी आजच बातमी वाचली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचा तो अधिकार आहे.
अमोल मिटकरींचे टोचले कान
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना कुठल्याही राजकीय क्षेत्राच्या व्यक्तीने मत व्यक्त करत असताना कुठल्याही समाजाच्या तसेच कुठल्याही घटकाबद्दल बोलताना तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे.अस देखील यावेळी पवार म्हणाले.