आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चेचे दरवाजे बंद- प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल.

Updated: Feb 12, 2019, 09:39 PM IST
आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चेचे दरवाजे बंद- प्रकाश आंबेडकर title=

कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्याची चर्चा तुर्तास थांबल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा बंद झाल्याचे सांगितले. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढायला तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसला आपण संघाच्या विरोधात लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल. अन्यथा चर्चेचे गाडे पुढे सरकणार नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले. तसेच भारिप बहुजन महासंघ उमेदवार जाहीर केलेल्या जागांवर १०० टक्के लढेल. जागावाटपाच्या चर्चेत यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. 

अमरावती | काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष- प्रकाश आंबेडकर

यापूर्वीही प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सगळ्या ४८ जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती, त्यासाठी चर्चाही झाली, पण आमचा लढा गैरसंविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या संघाशी आहे. संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसने आराखडा द्यावा, अशी मागणी आम्ही अनेकदा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसने कोणताही प्रतिसाद न दिल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी सांगितले होते.