IPL Mega Auction: बिहारचे संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या 10 वर्षाच्या मुलाची क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण कऱण्यासाठी जमीन विकली तेव्हा त्यांना पुढील 3 वर्षात मुलगा इतिहास रचेल याची अजिबात जाणीव नव्हती. जेद्दाह येथे सुरु असल्याने आयपीएल मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाखांमध्ये विकत घेतलं. यानंतर तो आयपीएलच्या इतिसाहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. मुलाच्या या यशावर बोलताना त्याच्या वडिलांना शब्द मिळत नव्हते.
वैभव सध्या अंडर-19 आशिया कपच्या निमित्ताने दुबईत आहे. त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "तो फक्त माझा मुलगा नाही, तर संपूर्ण बिहारचा मुलगा आहे". पुढे ते म्हणाले, "माझ्या मुलाने फार मेहनत केली आहे. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने अंडर-16 च्या ट्रायल्समध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मी त्याला कोचिंगसाठी 15 किमी लाबं समस्तीपूरला नेत असे आणि नंतर परत आणत असे".
क्रिकेट ही गुंतवणूक असताना आर्थिक स्थिती कशी होती? असं विचारलं असता ते म्हणाले, "केवळ गुंतवणूक नाही, तर ही एक मोठी गुंतवणूक आहे. मी माझी जमीन विकली आहे. आर्थिक समस्या अजूनही आहेत".
अनेकांच्या मते वैभवचं खरं वय 15 वर्षं असून त्यावरुन निर्माण झालेल्या वादाबद्दल विचारलं असता, त्यांनी स्पष्टीकरण दिलं की, "जेव्हा तो साडेआठ वर्षांचा होता तेव्हा तो पहिल्यांदा बीसीसीआयच्या हाडांच्या चाचणीसाठी हजर होता. तो आधीच भारतासाठी अंडर-19 मधून खेळला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. तो पुन्हा वयाची चाचणी देऊ शकतो".
संजीव यांनी सांगितलं की, बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी यांच्यामुळे वैभवने आज हे यश मिळवलं आहे. राकेशजी यांचे फार आशीर्वाद आहेत असं ते सांगतात. लिलावात त्याची मूळ किंमत 30 लाख होती. दिल्ली कॅपिटल्सने सुरुवातीची बोली लावली. यानंतर राजस्थान रॉयल्सने 35 लाखांची बोली लावली आणि अखेर 1.10 कोटींपर्यंत पोहोचले.
वैभव आयपीएल मेगा लिलावात कसा पोहोचला याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "राजस्थान रॉयल्सने त्याला नागपुरात ट्रायल्ससाठी बोलावलं होतं. विक्रम राठौर सर (फलंदाजी प्रशिक्षक) यांनी सामन्याची परिस्थिती सांगितली जिथे त्याला एका षटकात 17 धावा कराव्या लागणार होत्या. त्याने तीन तडाखेबंद षटकार मारले. ट्रायलमध्ये, त्याने आठ षटकार आणि चार चौकार मारले," असं त्यांनी अभिमानाने सांगितलं.
13 वर्षांच्या मुलासाठी एक कोटी कमविणे म्हणजे काय हे समजणं खूप कठीण आहे. मग ते आपल्या मुलाला पैशांपासून दूर कसे ठेवतात यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, "त्याला फक्त क्रिकेट खेळायचं आहे आणि दुसरं काही नाही. काही वर्षांपूर्वी त्याला डोरेमॉन आवडत होता, पण आता नाही".