मुंबई : एमपीएमसीची मुख्य परीक्षा पास झालेला विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने मुलाखत न झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे. यानंतर समाजातील सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बेधडक विचार मांडणारा अभिनेता प्रवीण तरडेने देखील यावर आपलं बेधडक मत व्यक्त केलं आहे. प्रवीण तरडे याने यावेळी आपण एमपीएससीचे विद्यार्थी होतो, तेव्हा विद्यार्थ्यांची स्थिती काय असते हे पाहिलं आहे, प्रवीण तरडे यांनी एमपीएससी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांना याबाबतीत धू-धू धुतले आहे.
मी माझं स्वत:चं उदाहरण देतो १९९७ ते 2000 साली सलग दोन वर्ष पेपर फुटत होते एमपीएसचे, आणि एमपीएसची पोरं काय तयारी करतात हे मला माहिती आहे. मेस लावाायची, मी देखील पुण्यातल्या एका मेसला होतो. कित्येकजण तर एक टाईमच जेवता, आणि याच्यातूनच तयारी करतात.
स्टडी सर्कल असेल, चाणक्य असेल, क्लासला जातात. त्याच्यानंतर आपल्या गरीब आई-बाबांना यातून बाहेर काढण्यासाठी धडपड करतात. म्हणजे ज्याने आत्महत्या केली त्याला आत्महत्या करु नकोस, असं तर आता सांगण्यात अर्थ नाही.
कारण तो जीव आपल्यामधून गेलाय. फक्त त्या वाटेवर कुणी जाऊ नये म्हणून प्रयत्न केला पण, काय करणार. आपल्याकडे सामाजिक जी परिस्थिती आहे ती तरुणांनी खरचं काहीतर घेवून जगावं अशी आहे का? याचा मुळात आपण विचार केला पाहिजे.
स्वप्निल लोणकर आज त्याची आई ज्या पद्धतीने रडत होती . ते बघून डोळ्यात पाणी येत होतं. चार-चार वेळा मोबाईलवर ते पहाताना मोबाईल बंद केला. कारण तिथे स्वत:ची आई दिसायला लागली. ९९साली मी काय, पिट्या परदेशी काय. जेव्हा आम्ही एमपीएससीचा तीन-तीन वर्ष अभ्यास करत होतो. आमचं वय निघून जात होतं आणि ईथे पेपर फुटत होते. बरं पेपर फुटण्याला प्रशासनातलीच लोकं जबाबदार होती.
विद्यार्थी कधी जबाबदार नव्हता. स्वप्निल आत आपल्यात नाहीये याला जबाबदार कोण...म्हणजे तरुणांनी आत्महत्या करु नये. मुलांनी आई-वडिलांना जपा , त्यांची स्वप्न पहा, हे सांगण फार सोप आहे. माझ्याही मनात असा कित्येकवेळा विचार आलेला आहे आत्महत्येचा.
ज्यावेळी सलग तीन-तीन वर्ष पेपर फुटत होते. जी माणसं हे पेपर फोडत होती. किती रुपयांसाठी फोडत होती. याचा पण विचार केला पाहिजे आपण. आपल्या इथली राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे. इतकी बकवास लोकं आपल्या नशिबात आलेली आहेत. सगळीकडेच.
कुणालाही कसलच ताळतंत्र नाहीये. स्वत:च्या राजकारणात ते रमलेले आहेत. सहा महिन्यांनी हा पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. तो पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. आज तो इथे जातोय, आज कार्यकर्ता याच्यासाठी भांडतोय त्याच्यासाठी भांडतोय. एकमेकांची डोकी फोडतोय.
परिक्षा झाल्या कधी, तो पास झाला कधी, त्याने किती कर्ज काढलं. २ वर्ष त्याला का नाही जॉब मिळाला? नक्की कुठल्या याच्यात सत्ता गुंतलीये? राजकारणी नक्की कशांत गुंतलेत. शेतकरी मरतोय, एमपीएसी केलेला तरुण मरतोय. अरे जगतंय कोण मग? राजकारणी?
या जगात फक्त राजकारण्यांनी जगायचं का? त्यांच्या पोरा-बायकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं? आणि सामान्य माणसांनी मरायचं... त्यामुळे आपण यांच्याबदद्ल गोड-गोड बोलणं बंद केलं पाहिजे. आणि यांची गोड-गोड भाषण ऐकणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, एमपीएसी करणारे मरणार, कला क्षेत्रातली माणसं मरणार, जगणार कोण राजकरणासंबधातली लोकं?
आज अशी राज्यात आणि देशात परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे स्वप्निल लोणकरच्या आईच्या डोळ्यात बघा. नक्की कोणाबद्दल आक्रोश आहे. मी सगळ्यांबद्दल बोलतोय सगळेच एका माळेचे मणी आहेत. सगळ्यांनी मिळून अशी परिस्थिती निर्माण कलेली आहे की, प्रत्येकाच्या मनात आत्महत्येचा विचार येईल.
यावर प्रश्न कोणीच उपस्थित करु शकतं नाही. यावंर जर कोणी प्रश्न उचलले तर राजकारणी त्यांचे कुत्रे सोडतील. ट्रोल करण्यासाठी, यामुळे या देशात सामान्य माणूस रस्त्यावर यायला घाबरतोय. सामान्य माणूस जोपर्यंत रस्त्यावर येत नाही ना, तोपर्यंत यांची डोकी ठिकाणावर येणार नाहीत. लोकमान्य टिळक घरांघरात जन्माला आले पाहिजेत.
छत्रपती शिवाजी महाराज घरा-घरात जन्माला आले पाहिजेत. तेव्हा यांची डोकी ठिकाणावर येतील. प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय. प्रत्येक राजकारण्याच्या तोंडात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. शिवाजी महाराजांचा कुठला गुण अंगी आहे यांच्या. माझा राजा यांच्यासाठी झटलाय. माझा राजा रयतेसाठी झटला आणि हे रयतेच्या रणावर उठलेत.
बरं सगळे एका माळेचे मणी आहेत. मी कुठल्याही एका पक्षावर किंवा एका राजकारण्यावर टिका करत नाहीये. मी सगळ्यांवर टिका करतोय. म्हणून मी म्हणतोय सगळा समाज एक दिवस आत्महत्या करेल. आणि राजकारणी फक्त जगतील या देशामध्ये ही परिस्थिती आहे.
एकवेळचं मेसचं जेवणं जेवायला ज्या पोरांकडे पैसे नसतात त्यांना जावून विचारा. आणि आज ज्या कष्टानं त्यांनी आपल्या पोरांना वाढवलं ते नाहक गेलयं., याचा अभ्यास आपण करत नाही. कारण या आत्महत्येचा अभ्यास करण्याआधी दुसरं कोणीतरी आत्महत्या करणार आहे. दुसरा आत्महत्या करण्याआधी तिसरा कोणीतरी आत्महत्या करणार आहे. रोज माणसं मरणारच आहेत. तुमचा एक पत्रकार तडफडून-तडफडून मेला.
हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाला नाही म्हणून आपण विसरुन गेलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून कुणीतरी तडफडून गेलं, परिस्थिती भयान आहे. आणि आपल्याकडे बातम्या घडतायेत आणि त्याच्यामुळे आपल्याला किंमत राहत नाहीये. सगळे राजकारणी देखील तळमळीने बोलतात. त्या तळमळीने बोलत नाही यातला भाग नाहीये. पण तळमळीने करता काय....सहा महिन्यांपूर्वी आंदोलन झाली, परीक्षा घ्या, वैगरे.. परीक्षा झाल्या. सहामहिने परीक्षांसाठी भांडलो. दोन वर्षांपूर्वी परीक्षा झाल्या. मग स्वप्निल का मेला.
येवून बघा मी एस पी कॉलेजला राहायचो. चार जणांच्या कॉट बेसीसवर राहायचो. सगळे एमपीएसी, यूपीएसी करणारे होते. एक दिवस जर परीक्षा पुढे जर गेल्या ना तर ढसाढसा रडताना पोरांना आम्ही पाहिलेलं आहे. का माहितये का?
परीक्षा जोपर्यंत आहे तोपर्यंतच पोरांच्या खिशात बजेट असतं. परीक्षा दोन दिवस जरी पुढे गेली ना. तरी इथे दोन दिवस उपाशी रहावं लागतं. कारण त्या पोरांची स्वप्न मोठी असतात. तुम्ही एकदा विश्वास नांगरे पाटलांना याबद्दल विचारलं पाहिजे. असे दिवस-रात्र अभ्यास करुन ते पुढे गेलेले आहेत. तुम्ही कृष्ण प्रकाशांना विचारलं पाहिजे ही मोठी नाव एमपीएसीसाठी झगडलेली आहेत. तेव्हा सव्वा चारशे रुपये भाडं असायचं मेसचं एका वेळचं. त्यामुळे ते भाडं देताना मेसच्या मावशीच्या हाता पाया पडावं लागायचं.
अशावेळी पोरांची परीक्षा दोन दिवस पुढे जाते. त्यावेळी काय परिस्थिती येते तेव्हा त्या पोरांना विचारा आणि ईथे तर तुम्ही दोन -दोन वर्ष तुम्ही एमपीएसी झालेल्या पोरांना नोकरी देत नाही. नक्की कशात बिझी आहात. सगळं योग्य चाल्लय ना... हिवाळी अधिवेशन चाल्लीयेत, उन्हाळी अधिवेशन चाल्लीयेत. राजकारण्यांची लग्न चाल्लियेत, आणि तरुणांना नोकऱ्या द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये. १३-१३ आमदारांच्या नोकऱ्या होण्यासाठी रोज राज्यपालांकडे जाताय. आणि यांना वेळ नाहीये एमपीएससी, युपीएससीच्या पोरांसाठी यांच्याकडे नोकऱ्या नाहीयेत. या देशात फक्त राजकारण्यांनी जगायचं का?
रस्त्यावरील फुटपाथवरील कॉन्टट्रक्टरकडून पैसे खाणारी ही माणसं. त्याच्यासाठी रोज फुटपाथ पाडणारी ही लोकं. यांना आपण आयडॉल करुन बसलोत. देशाचा आणि राज्याचा मग अशेच तरुण मरणार. काल एका कलादिग्दर्शकानं आत्महत्या केली. अशी सगळी लोकं मरणार फ्क्त जिवंत राजकारणी. यांच्या बद्दल काय बोलायला गेलो तर ट्रोल करतील पण त्या सामान्य ट्रोलर्सना हे कळत नाहीये एकदिवशी माझ्यावरच येईल. आपल्या घरातलं कोणीतरी मरणार आहे. सुखी फक्त हे लोक रहाणार आहेत. या देशात आणि राज्यात
अभ्यास करुन आणि त्या आई-बाबांनी कष्ट घेवून तुम्ही ईथंपर्यंत आलात. कुठल्यातरी फाल्तु सिस्टीमसाठी स्वत:चा अमूल्य जीव वाया घालवू नका. पेशन्स धरा. हा राग मनात साठवा. प्रशासकीय सेवेमध्ये जावून यांना उघड पाडा. आत्महत्या नका करु. तुम्ही आत्महत्या करुन या गेंड्यांची कातडी असणाऱ्या लोकांना काहीच फरक पडत नाही. फरक पडेल तुमच्या आई-बाबांना. तुमची आई रडतेय. ज्यांच्यासाठी , ज्याच्या सिस्टीमला कंटाळून तुम्ही आत्महत्या केली.
ते नवीन सत्ता नवीन मित्र करण्यासाठी गुंतलेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकराणत आण्यासाठी गुंतलेले आहेत. तुम्ही कसलं त्यांना सपोर्ट करताय. तरुण मरतायेत. त्यामुळे बाबांनो आपल्या आई-बाबांचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा. काही नाही गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांच्या डोळ्यात पाणी आलेलं असेलं. पण यांच्या (राजकारण्यांच्या) डोळ्यात पाणी येणार नाही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला.