Kalyan Crime News: बदलापूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानकातील शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. धक्कादायक म्हणजे फक्त 5 रुपयांवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
बदलापूर रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये गेलेल्या एका २८ वर्षीय व्यक्तीने ५ रुपये सुट्टे नसल्याचे बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर (अॅसिड) बाथरूम क्लिनर द्रव फेकले आहे. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग याला अटक केली तर त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतले आहे.
आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर २८ वर्षीय विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहतात. ते रिक्षाचालक असून १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर रेल्वे स्थनाकात प्रवाशी येण्याची वाट पाहत असतानाच त्यांना नैसर्गिक विधीसाठी बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेले होते. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आरोपी बाप लेकाने विनायक यांच्याकडे पाच रुपये द्यायला सांगितले. मात्र, त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी 5 रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळं वाद होऊन आरोपी बाप लेकानी मिळून त्याला बेदम मारहाण केली.
१५ वर्षीय अल्पवीयन मुलाने विनायक यांच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर विनायक यांच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम १२४ (१) ३५२,११५(२) , ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे शौचालय चालक योगेशकुमार याला अटक केली तर त्याच्या १५ वर्षीय मुलाची रवानगी भिवंडी बालसुधार गृहात करण्यात आली आहे