सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून (Pune News) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर या चिमुकलीला असे टाकून दिल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते.
कोरेगाव भीमा परिसरातील फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार फॅब्रिकेशन समोर मुलीचे अर्भक असल्याचे स्थानिक नागरिक अजय गव्हाणे व किरण गव्हाणे यांनी सांगितले. त्यानंतर याबाबत शिक्रापूर पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना कळवले असता त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस नाईक अपेक्षा तावरे, पोलीस अंमलदार प्रताप कांबळे, यांच्यासह 108 अँब्युलन्स कर्मचारी व डॉक्टर पोळ यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी सहा महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेत येऊन पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे दाखल केले.
सकाळच्या सुमारास रस्त्यावर आईने या लहान मुलीला टाकून पळून काढला होता. थंडीत ही चिमुकली कुडकुडत आणि रडत होती. त्या चिमुकलीला किटकांचा देखील त्रास होत होता. त्यावेळी तिथून जाणारे किरण गव्हाणे यांना तो लाकडी बॉक्स दिसला. त्यांनी पोलीस येई पर्यंत पाऊण तास अर्भकाशेजारी बसून माशा दूर केल्या. यावेळी त्यांचेही डोळे पाणावले होते. पोलीस आता या चिमुकलीच्या आईचा शोध घेत आहे. पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दखल करण्याचे काम सुरू असून स्वतच्या आईने पोटच्या गोळ्याला अस रस्त्यावर टाकून सोडून जाणं हे सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे.