पुणे : मुलींचा लैंगिक आणि मानसिक छळ होत असल्याच्या बातम्या दिवसेंदिवस समोर येत आहेत. काही महिला लग्नानंतर आपल्या सासरच्या लोकांच्या छळाला सामोरं जातात, परंतु त्यातील काही अशा देखील महिला असतात ज्या याचा विरोध करतात आणि पोलिस्टेशन गाठून आपल्या पती किंवा सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल करतात. परंतु सध्या पुण्यातून जी घटना समोर आली आहे ती धक्कादायक आणि या घटनांच्या अगदी विरुद्ध आहे.
येथे एका बायकोने लग्नानंतर आपल्या नवऱ्याला त्रास देऊन त्याची बदनामी करुन त्याला मानसिक त्रास दिला. ज्यामुळे त्या नवऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. ज्यानंतर त्याची तक्रार घेऊन पोलिसांनी त्याच्या बायकोसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार जानेवारी २०१९ ते २३ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. त्यामुळे 30 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे.
या नवऱ्याने दिलेल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, त्याची बायको वारंवार काहीना काही कारणं शोधून त्याच्यासोबत भांडण काढायची आणि शिवीगाळ करायची. त्याची बायको एवढ्यावरच न थांबता ती, त्याला धमक्या ही देऊ लागली होती. तसेच इतर आरोपी हे या नवऱ्याच्या संसारात हस्तक्षेप करुन त्याच्या घरच्यांची बदनामी करु अशा धमक्या देत शिवीगाळ करायचे.
एवढ्यावरच न थांबता आरोपी बायको माझा नवरा नपुंसक आहे, असे देखील समाजात खोट बोलून त्याची बदनामी करु लागली आणि त्याला मानसिक त्रास देऊ लागली. ज्यामुळे नवऱ्याने शेवटी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या तक्रारदार नवऱ्याने पोलिसांना सांगितले की, "२३ जानेवारी रोजी आरोपींनी माझ्या घरात घुसून जबरदस्तीने कपाटातील आईचे अदांजे ८ ते ९ तोळे सोन्याचे दागिने, २५ तोळे चांदीची पट्टी आणि इतर सोन्याचे दागिने घेऊन गेले."
न्यायदंडाधिकारी (JMFC, Shivajinagar Court) यांच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी या प्रकरमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.