पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव श्याम भदाणे असं आहे.
ही व्यक्ती पुण्यातील एका न्यायाधीशाचा पती आहे. मारहाण करताना श्याम भदाणेसह असणारी महिला, म्हणजे त्यांची मुलगी असल्याचं सांगण्यात येतंय. बुधवारी रवींद्र इंगळे आणि कैलास काळे हे दोघे कर्मचारी वाहतूक नियमनाचं काम करत होते.
त्या दरम्यान सिग्नल तोडून निघालेल्या एका मोटारसायकलला त्यांनी अडवलं. त्यावरून मोटारसायकल चालक आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर चालकानं थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
इतकंच नाही तर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या महिलेने मिळून पोलिसांना मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान न्यायाधीशाचा पती आणि मुलगी असल्यानं, पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नसल्याची चर्चा आहे.
पोलीस खातंच अशा दबावाला बळी पडत असेल तर सामान्यांचं मनोबल खच्ची झाल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय न्यायाधीशांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना कायदा हातात घेण्याचा काय अधिकार आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जातोय.