सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे पोलिसांकडून (Pune Police) दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षिसं दिली जातात. पण ही यादी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील आरोपींना अटक करणाऱ्या, विविध गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त शंभर रुपये बक्षीस देण्यात आलं आहे. तर वरिष्ठांना घरून पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन वरून पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपयांचं बक्षीस पोलीस उप आयुक्त पोर्णिमा गायकवाड (Purnima Gaikwad) यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बक्षिसाची यादी पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे.
पोलीस आयुक्तालयाकडून 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कामगिरीनुसार रिवार्ड (Reward) म्हणून देण्यात येते. नुकतंच पुणे पोलिसांच्या उत्तम कामगिरीसाठी पोलिस आयुक्तांकडून देण्यात येणारे रिवॅार्ड जाहीर करण्यात आले आहेत .सध्या परिमंडळ 3 च्या आयुक्तांनी दिलेल्या रिवॅार्डची एक यादीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होतेय.
पोलिस आयुक्तालयाच्या रिवॅार्ड गॅझेटमध्ये प्रत्येक उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणून त्यांना रिवॅार्ड म्हणजेच बक्षीस दिलेल्याची यादी असते. पुणे पोलीसांच्या रिवॉर्ड गॅझेट लिस्टमध्ये परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हर आणि गार्ड म्हणून नियुक्त असलेल्या चार पोलिस शिपायांना तब्बल 21 हजार रूपये प्रत्येकी इतके रिवॅार्ड देण्यात आलं आहे. आता हे बक्षिस त्यांना कशासाठी देण्यात आलं आहे तर मॅडमना व्यवस्थित घरी आणि पोलीस आयुक्तालयात बैठकीसाठी पोहचवलं यासाठी.
तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गंभीर गुन्हयामधल्या गुन्हेगारांना जीवावर उदार होऊन पकडून आणणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केवळ 100 रुपयांचं बक्षीस दिलं आहे. त्यामुळे साहेबांना वेळेत पोहचवणऱ्या कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम तर दुसरीकडे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निराशा असं चित्र पाहिला मिळतंय.
या रिवॉर्डमध्ये पोलीस शिपाई बोरकर, पोलीस शिपाई पवार, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई शेख, या या चार कर्मचाऱ्यांना दहा वेळेस ही बक्षीस देण्यात आली. याबाबत पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांना विचारला असता त्यांनी नो कमेंट असं उत्तर दिलं.