अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही दिवस उलटले असून, सदर प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. यादरम्यानच अपघातानंतर गुन्ह्याची नोंद झालेल्या 'त्या' अल्पवयीन तरुणाच्या रक्त नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेला डॉक्टर अजय तावरे हाच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचं आता उघड झालं आहे.
अल्पवयीन तरुणाच्या वडील विशाल अग्रवाल याने ससून मधील डॉक्टर अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करायला सांगितलं होतं. विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्यामध्ये व्हॉट्स ॲप कॉल झाला होता. दोघांमध्ये संभाषण झाल्याचं मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून समोर आलं आहे.
गुन्ह्याचा तपास भरकटवण्याच्या उद्देशाने डॉक्टर तावरे यांनच रक्त नमुने बदलण्याचा कट रचला होता. त्यासाठी ससूनमधील डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि आणि कर्मचारी अतुल घटकांबळे यांना डॉक्टर तावरे यानेच तीन लाख रुपये दिल्याचा समोर आलं आहे. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. डॉक्टर तावरेला ही रक्कम विशाल अगरवालनेच दिली होती का त्याचप्रमाणे डॉक्टर हळनोर याने दुसऱ्या कुणाचा रक्त नमुना घेतला होता याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटातील आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांचे निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला आहे. त्याप्रमाणे त्यांच्यावरील गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची एसीबीकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे
दरम्यान मंगळवारी डॉक्टर तावरेच्या घराची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. कॅम्प परिसरातील गीता सोसायटीमध्ये डॉक्टर तावरे राहतो. त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य दत्त करण्यात आल्याच कळतंय.
पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील पोर्श गाडीची नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आरटीओनं अखेर घेतला. अपघातग्रस्त गाडी अल्पवयीन तरुण चालवत होता, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून, बंगळूरहुन आणलेल्या गाडीला नंबर मिळण्यापूर्वीच ती 166 किलोमीटर चालवली गेल्याचं आरटीओच्या तपासणीत आढळून आलं आहे. मार्च महिन्यापासून ती कार पुण्यात होती. कारला अपघात झाला त्यावेळी तिचा वेग ताशी 160 किलोमीटर असल्याचं आरटीओला दिसून आलं आहे.
परिणामी या गाडीची पुण्यातील नोंदणी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. बंगळूरु आरटीओनंही त्यांच्याकडील तात्पुरती नोंदणी रद्द करावी असं पत्र पुणे आरटीओकडून पाठवण्यात आलं आहे. दरम्यान पोर्श कंपनीच्या पथकानंही त्या अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली. त्याचा अहवाल पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.