नागपूर : शहर आणि परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. काळ्या ढगांची गर्दी झाली असून शहरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. (Rain in Nagpur) हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही विभागात अगोदरच पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सकाळपासून नागपुरात काळ्या ढगांची दाटी दिसून आली. पाऊस ढगांच्या गडगडाटही सुरु आहे. शहराच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज नागपुरात पावसाला सुरुवात झाली आहे. नागपुरात उद्या वादळ आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 20 मार्चपर्यंत शहर तसंच अन्य भागांत ढगाळ वातावरण राहणार, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊस आणि गारपिटीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
हवामाना विभागाच्या अंदाजानुसार 20 मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यताय. सध्या काश्मीर, लडाख या भागांत पश्चिमी विक्षोपाचे वारे वाहत असून त्यामुळे हिमवृष्टी होतेय. तसंच पूर्वांचल भागात वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पश्चिम व पूर्वेकडील वाऱ्यांचा एकत्रित प्रभाव मध्य भारतावर होणारेय. त्यानुसार नागपूर शहर आणि विदर्भात किंचित ढगाळ वातावरण तयार झालंय. बुधवारी काही ठिकाणी पावसाचीही नोंद झाली. शुक्रवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.