Mumbai teachers Election Duty : मुंबईतील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी (Election Duty) लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला होता. अशातच इलेक्शन ड्युटी लावल्याने अनेक शिक्षकांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध केला होता. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील यावर भूमिका मांडली होती. निवडणूक आयोगावर शिस्तभंगाची कारवाई का होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला होता. अशातच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
शिक्षकांवर विद्यादानाची महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांच्यावर निवडणुकांच्या कामाचा अतिरिक्त भार अवेळी टाकणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी भूमिका घेतली आणि अतिशय जबाबदारीने शिक्षकांना आवाहन केलं की, "कुणीही आयोगाला सहकार्य करू नका, कोण कारवाई करतं ते मी पहातो"
पण हा असहकार पुकारायच्या आधी म्हटलं आयोगाला एकदा समजावून सांगू... त्या अनुषंगाने माझे सहकारी नेते 'मुख्य निवडणूक आयुक्तां'ना पक्षाच्या अधिकृत निवेदनासह भेटले. त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितला, पर्यायही सुचविले. पालकांमध्ये असणारा रोष आयोगपर्यंत पोहचवला.
या सर्व पाठपुराव्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने शिक्षकांसाठी कार्य सक्तीचे आदेश मागे घेतले आहेत. तसंच आयोगाने निवडणूक प्रक्रियेत मनुष्यबळ उभं करण्यासाठी अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे आणि तसं त्यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसिद्धही केलं आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे माझ्या पक्षातर्फे, समस्त शिक्षकवृंद तसंच चिंतातुर पालक आणि विद्यार्थ्यांतर्फे मन:पूर्वक आभार मानतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पाहा Video
शिक्षकांवर विद्यादानाची महत्त्वाची जबाबदारी असताना त्यांच्यावर निवडणुकांच्या कामाचा अतिरिक्त भार अवेळी टाकणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी भूमिका घेतली आणि अतिशय जबाबदारीने शिक्षकांना आवाहन केलं की, "कुणीही आयोगाला सहकार्य करू नका, कोण कारवाई करतं ते मी पहातो ! "
पण हा असहकार… pic.twitter.com/6J4sjRcoEz
— Raj Thackeray (@RajThackeray) February 24, 2024
दरम्यान, मुंबईतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटीतून वगळून अन्य कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली.