सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. आज राज्यभरातील गावागावात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. या आंदोलनाचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर कोणताही परीणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन जरांगे यांनी आंदोलकांना केलंय. मात्र नांदेडमध्ये रुग्णालयात मुलाला घेऊन जाणाऱ्या महिलेची गाडी अडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मराठा आंदोलनादरम्यान गाडी अडवल्याने महिलांनी आंदोलकांशी झटापट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मनाठा पाटीजवळ ही धक्कादायक घटना घडली. मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर नांदेडच्या मनाठा पाटीजवळ रास्तारोको आंदोलन सुरू होते. मात्र यावेळी मराठा आंदोलकांनी एक बस अडवल्याने मोठा वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला आंदोलकांशी झटापट करताना दिसत आहे.
नाठा पाटीजवळ रास्तारोको सुरु असताना हदगावकडून एक खाजगी बस नांदेडकडे जात होती. रास्तारोको असल्याने ही खाजगी बस आंदोलकांनी अडवली. त्यानंतर बसमधून तीन महिला खाली उतरल्या. मुलाला नांदेडला दवाखान्यात न्यायचे असल्याने बस जाऊ द्यावी अशी विनंती महिलांनी केली. मात्र आंदोलनकांनी बस पुढे जाऊ दिली नाही. पण बस जाऊ देत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलकांशी झटापट केली. गाडीच्या ड्रायव्हर जवळ जाऊन ही महिला आक्रोश करत होती. त्याचवेळी या महिलेच्या हातातील बांगड्या देखीलही फुटल्या. मात्र तरीही मराठा आंदोलक गाडी पुढे जाऊ देत नव्हते. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
वाशिमच्या तामसी फाट्यावर रास्ता रोको
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी वाशिमच्या मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील आवाहनानुसार त्यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने अकोला - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर वाशिमच्या तामसी फाट्यावर रस्ता रोको करण्यात आला. दरम्यान मराठा आरक्षण देण्याबाबतच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करण्यात आली. या महामार्गावर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आला होता. जवळपास अर्धा तास हा रस्ता रोको चालला. त्यामुळे काही काळ वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी इशारा देण्यात आला.