शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप

खोट्या बहाण्यानं शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तावेज मिळवून रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला.

Updated: Jul 9, 2017, 07:32 PM IST
शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतल्याचा रत्नाकर गुट्टेंवर आरोप title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : हजारो शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा करणा-या रत्नाकर गुट्टेनं शेतक-यांचा विश्वासघात केला. खोट्या बहाण्यानं शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तावेज मिळवून रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला.

परभणी जिल्ह्यातला रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी हा या भागातला पहिला साखर कारखाना. काही वर्षांपूर्वीपर्यंत दुसरा कारखाना उपलब्ध नसल्यानं, शेतकऱ्यांनी गंगाखेड शुगर्सला ऊस द्यायला सुरुवात केली. इतर कारखान्यांच्या तुलनेत गंगाखेड साखर कारखान्याचा दर एफआरपीपेक्षा पाचशे रुपयांनी कमी होता. 

केंद्र शासनाकडून एफआरपीप्रमाणे भाव मिळवून देतो असं सांगत, शेतकऱ्यांची दिशाभूल करुन रत्नाकर गुट्टेच्या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांकडून कागदपत्रं मिळवली. 

गंगाखेड शुगर्सनं शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रं घेतली. धक्कादायक बाब म्हणजे सह्या केलेले शंभर रुपयांचे कोरे बाँड, या शेतकऱ्यांकडून गंगाखेड शुगर्सनं घेतले. या कागदपत्रांद्वारेच रत्नाकर गुट्टेनं कोट्यवधींचं कर्ज उचललं. 

या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन, रत्नाकर गुट्टे विरोधात तक्रारी दिल्यात. रत्नाकर गुट्टेला अजूनही अटक का होत नाही असा सवाल शेतकरी करताहेत. हे प्रकरण पोलीस किती गांभीर्यानं घेतात, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर सरकार याबाबत काय करतं हे पाहणंही औस्त्युक्याचं ठरणार आहे.