मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, प्रतिनिधी, शिर्डी : साईबाबांच्या शिर्डी नगरीत सध्या गुरू पौर्णिमेची महोत्सव सुरू असतानाच दुसरीकडे राजकीय मैत्रीचा सोहळा चांगलाच रंगला. याचे नायक होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा चे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील. निमित्त होते शिर्डी मध्ये पाणी पुरवठा योजनेच्या भूमीपूजनाचे.
या कार्यक्रमचे अध्यक्ष विखे पाटील तर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी राज्याच्या राजकणात असा सोहळा सहसा बघता येत नाही असे सांगत विखे पाटील यांच्या बरोबरचे ऋणानुबंध आहेत, भविष्यात ते अधिक वृद्धिंगत मात्र किती आणि कधी होतील याची उत्सुकता असल्याचे वक्तव्य केले तर तोच धागा पकडून विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि माझ्या मैत्रीवर शिक्कामोर्तब झाल्याचे जाहीर करून टाकले.
यानंतर बोलायला उभे राहिलेल्या मुख्यमंत्री यांनी सुदृढ लोकशाही मध्ये अशी मैत्री असणे गैर नाही पण असे वक्तव्य केल्याने विखे पाटील यांच्या अडचणी वाढतील असा टोला दिला.
गेल्या काही दिवसात विखे पाटील भाजपशी जवळीक साधून आहेत आजच्या कार्यक्रमातून त्यावर मोहर उमटली असून विखे कधी पक्षाला रामराम ठोकतील अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. त्याला कारण ही विखे यांची एकसे एक धक्कादायक विधान आणि त्याला मुख्यमंत्री यांची शेरेबाजी कारणीभूत होती.
निळवंडे धरणाच्या पुर्णत्वाचे काम राजकारणामुळे रखडल्याचा आरोप करत विखे पाटलांनी स्वकीयांचीच धुलाई केली तर मुख्यमंत्री यांनी तुमच्या काळात रखडलेले काम एक दीड वर्षात पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले.
भाजपच्या कळपात दाखल झालेले विखे पाटील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मागच्या वेळ पेक्षा सध्याचे मंत्री जास्त जवळचे वाटतात. आज घरी आल्यासारखे वाटत असल्याचे धक्कादायक वक्तव्य करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली.
मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या विधानाचा आधार घेत विखे यांचे विरोधी पक्षात मित्र जास्त आणि स्वतःच्या पक्षात विरोधक जास्त असा टोला लागवून त्यांच्या मर्ममावर बोट ठेवले.
शेवटी जाताजाता मुख्यमंत्र्यांनी विखे त्यांच्या विरोधी पक्षनेतेच्या रोलमध्ये आणि मी माझ्या रोलमध्ये ठीक आहे मात्र भविष्यात काय घडेल हे सांगता येत नसल्याचे वक्तव्य करून पुन्हा राजकीय भूकंप होतो की काय अशी शंका निर्माण केली आहे.
काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांबरोबर व्यासपीठ शेअर केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आजच्या कार्यक्रम विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळत मैत्रीचे गोडवे गायल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पुढील काळात राजकीय क्षेत्रात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलंय.