Most Expensive Property Deal in Pune City: देशाची आर्थिक राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमधील प्रॉपर्टीचे रेट हे कायमच चर्चेचा विषय असतात. जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये समावेश होणाऱ्या मुंबईबरोबरच मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील प्रॉपर्टीचे रेटही लक्ष वेधून घेत आहे. पुण्यामध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत असून हिंजवडीमधील आयटी हब असो किंवा शहराचा वाढता पसारा असो अनेक कारणांमुळे पुण्यातील जागांचे दर वाढत असल्याचं दिसत आहे. असं असतानाच आता पुण्याच्या इतिहासातील सर्वात मोठी प्रॉपर्टी डील नुकतीच पार पडल्याचं समोर आलं आहे.
पुणे शहराच्या इतिहासातील सर्वात महागडी प्रॉपर्टी डील ही एका पेंटहाऊसची आहे. हे पेंटहाऊस 12 हजार स्वेअर फुटांचं आहे. हे पेंटहाऊस तब्बल 37 कोटींना विकलं गेलं आहे. हे पेंटहाऊस बंड गार्डन येथील लोढा वन येथे आहे. बांधकाम व्यवसायिक असलेल्या लोढ बिल्डर्ससाठीसाठी मार्कोटेक डेव्हलपर्सच्या माध्यमातून विक्री करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
मागील 2 वर्षांमध्ये म्हणजेच एप्रिल 2022 ते आजपर्यंत पुण्यामध्ये अशी 32 घरं विकली गेली आहेत ज्यांची किंमत 10 कोटींपेक्षा (करारनाम्यावरील रक्कम) अधिक होती. यापूर्वी पुण्यातील सर्वात महागड्या घराची किंमत ही 18.5 कोटी रुपये इतकी होती. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. नोंदणीनंतर रेरानुसार, लोढा वन (बंड गार्डन) येथील पेंट हाऊससाठी प्रती स्वेअरफूट 28 हजार ते 29 हजार रुपयांचा दर मोजण्यात आला आहे. या स्तरावरील प्रॉपर्टीसाठीचा हा सर्वोच्च दर असल्याचं कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. लोढा वन हा पुण्यातील सर्वात लक्झरी प्रोजेक्टपैकी एक आहे. या प्रोजेक्टमधील पेंटहाऊसला 'एम्परर पॅलेस' असं नाव देण्यात आलं आहे.
पुण्यामधील जमीनीची कमतरता आणि त्यावेळेस लक्झरी घरांना पुण्यात वाढती मागणी याचा मेळ साधण्यासाठी लोढाने बंड गार्डन येथे हा लक्झरी प्रोजेक्ट आणला आहे. लोढा वन बंड गार्डनमध्ये अनेक लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये खासगी टेरेस, स्वीमींग पूल्स देण्यात आले आहेत. तसेच लोढाची खासगी हॉस्पीटॅलिटी सर्व्हिसही देण्यात आली आहे.
लोढा वन हा पुण्यातील कॅम्प परीसरामधील सर्वात उंच टॉवर आहे. तसेच या प्रोजेक्टमध्ये 150 वर्ष जुनी दोन महाकाय वडाची झाडंही आहेत. पुण्यामध्ये सामान्यपणे 50 लाख ते 1 कोटींच्या रेंजमध्ये घरं उपलब्ध आहेत.