Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी झाले आहेत. उमेदवाराच्या कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघ चर्चेत आला होता. या मतदार संघातून भाजपचे उमेदवार पराग शहा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार राखी हरिश्चंद्र जाधव यांचा पराभव झाला आहे.
घाटकोपर गुजराती बहुल भाग असल्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य आहे. यामुळेच घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात भाजपने विद्यमान आमदार आणि उमेदवार पराग शहा यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर, त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राखी हरिश्चंद्र जाधव या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या मतदार संघात मनसेने देखील उमेदवार दिला होता. यासह पाच अपक्ष उमेदावर देखील निवडणुकीच्या रिंगणात होते.
पराग शहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 2019 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना पराग शहा यांची संपत्ती 500.62 कोटी इतकी होती. तर, आात 2024 मध्ये पराग शहा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा 3383.06 कोटी इतका आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपचा पगडा आहे. या मतदारसंघात मुलुंड,भांडुप,विक्रोळी,घाटकोपर पूर्व आणि पश्चिम तसेच मानखुर्द-शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या भागातून शिवसेना आणि भाजपचे सर्वाधिक आमदार आणि नगरसेवक निवडून येतात. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे संजय दिना पाटील यांनी मिहिर कोटेचा यांचा पराभव केलाय. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजयाची अपेक्षा होता. प्रत्यक्षात मात्र, उमेदवारांना परभवाचा सामना करावा लागला आहे.