वन विभाग, बांधकाम विभागाकडूनच सागवानाची बेकायदा तोड

वृक्ष संवर्धनाची जबाबदारी असणाऱ्या वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सागवान वृक्षाची राजरोसपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: Nov 29, 2017, 10:59 PM IST
वन विभाग, बांधकाम विभागाकडूनच सागवानाची बेकायदा तोड title=

यवतमाळ : वृक्ष संवर्धनाची जबाबदारी असणाऱ्या वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सागवान वृक्षाची राजरोसपणे कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

चौपदरीकरणाचं काम वेगानं  

करळगाव राखीव वनातली वृक्षतोड सुरु आहे. यवतमाळ-धामणगाव मार्ग चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असून त्यासाठी नियम, कायदे धाब्यावर बसवले जातायत.. वनाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार केल्याचा आरोप होतोय. 

अधिकाऱ्यांचा कक्षातून अक्षरश: पळ

यासंदर्भात झी 24 तासनं वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी आपल्या कक्षातून अक्षरश: पळ काढला. वन्यप्रेमींनी या गंभीर प्रकाराबद्दल संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे आरएसएसचे संस्थापक हेडगेवारांचं स्मारक व्हावं यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांनी इथं भेट दिली होती आणि नियमानुसार परवानगी प्रक्रिया सव्वा वर्षांपूर्वी सुरू केली होती. 

वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला हरताळ 

मात्र रस्ता चौपदरीकरणासाठी खुद्द वनाधिका-यांनीच हे सर्व नियम धाब्यावर बसवलेत. उपवनसंरक्षकांनी नियमबाह्य वृक्षतोड झाल्याची कबुली देत सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध कारवाईचं आश्वासनही दिलंय तर परवानगी मिळाल्यानंच कत्तल केल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं म्हणणंय. 

राज्य शासन एकीकडे वृक्ष लागवड विक्रमाचा डंका पिटत असतांना शासनाचेच दोन विभाग वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला हरताळ फासतायत. त्यामुळे यवतमाळमधल्या या वनगुन्ह्याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.