Sanjay Gaikwads Problems: आमदार संजय गायकवाड यांच्या गळ्यातील वाघाच्या दाताबद्दल वक्तव्यामुळे अडचणी वाढणार आहेत. बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंती दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे स्टेटमेंट नोंदविले आहे. वनविभागाने त्यांच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे.
बुलढाणा विधानसभा सदस्य संजय गायकवाड यांनी एक विधान केले आहेत. 1987 साली मी वाघाची शिकार केली आणि तो दात माझ्या गळयात असे विधान केले आहे. त्याबद्यलची ध्वनीचित्रफित समाज मध्यमावर प्रसारित झाली आहे. त्याची दखल घेऊन बुलढाणा वनविभागाने वाघाचा दात रितसर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
यासंदर्भात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अतर्गत बनगुन्हा क्रमांक-636/3/24 दिनांक-23.02.2024 नोंदविण्यात आला आहे. हा दात न्यायवैधीकीय तपासणीसाठी (Identification) तज्ञ संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक वनसंरक्षक (प्रा व कैम्पा) बुलढाणा हे करीत आहेत.
आमदारांच्या गळ्यातील तो वाघाचा दात सदृश्य वस्तूसुद्धा वन विभागाचे पथकाने जप्त केल्या आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे..वाघदात सदृश वस्तू वन विभागाने ताब्यात घेतली आहे. ही वस्तू देहरादून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 19 फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत दिली होती. गळ्यातील दात हा वाघाचा असून 1987 मध्ये त्याची शिकार केल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.
आमदार गायकवाडांचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतोय. आता यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे बुलढाणा प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत ठाकरे यांनी सांगितले. हा दात खरंच वाघाचा असेल तर यामधे 3 वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.