Sarpanch Removed Cloths For His Village: गावामध्ये विहिरी खणण्यासाठी लाच मागितली जात असल्याच्या मुद्द्यावरुन थेट 2 लाखांच्या नोटा उडवत अनोखं आंदोलन करणाऱ्या पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे (Sarpanch Mangesh Sable) यांची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. अशाप्रकारे साबळे यांनी गावासाठी अनोखं आंदोलन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी गावासाठी अशाप्रकारची आंदोलनं केली आहेत. एकदा तर त्यांनी गावातील वीजप्रश्न सोडवण्यासाठी थेट महावितरणाच्या कार्यालयासमोर कपडे काढून आंदोलन केलं होतं.
झालं असं की, औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील दोन ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे हाल होते. यातील एक ट्रान्सफार्मर अनेक दिवसांपासून बंद होता. तर दुसरा ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वी जळाला होता. ग्रामपंचायतीकडून अनेकदा मागणी करूनही दखल घेत नसल्याने शेवटी गावचा नवनिर्वाचित सरपंच मंगेश साबळे यांनी 2 जानेवारी रोजी थेट अंगावरील कपडे काढून अर्धनग्वावस्थेत आळंद येथील महावितरण कार्यालय गाठले होते. त्यांचा हा अवतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यामुळे तत्काळ प्रशासन यंत्रणा हलली व त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफार्मर गावात हजर झाले. जेथे अशा कामांना महिने लागतात तेथे एका दिवसांतच महावितरणने ट्रान्सफार्मर दिल्याची चर्चा पंचक्रोषीमध्ये सुरू होती.
गेवराई पायगा येथील एक ट्रान्सफार्मर डिसेंबर महिन्यात 15 दिवसांपासून बंद होता. यामुळे पाणी असूनही शेतकरी हवालदिल झाले होते. ट्रान्सफार्मर लागत असेल तर पहिले वीजबिल भरा अशी अट महावितरण कार्यालयाने घातली होती. रब्बीची पिके डोळ्यासमोर सुकत असल्याने शेतकरी अधिकाऱ्यांना गयावया करीत होते. त्यात पुन्हा गावातील पाणीपुरवठ्यासाठी असलेला ट्रान्सफार्मर 4 दिवसांपूर्वीच जळाला. यामुळे ग्रामस्थ पाण्यावाचून कासावीस झाले. यासाठी प्रयत्न करूनही महावितरणचे अधिकारी ऐकत नव्हते. गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणारे काँग्रेसचे मंगेश साबळे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर वीजबिल भरण्यास सांगितले.
अधिकारी सरळ पद्धतीने ऐकत नसल्याचे पाहून मंगेश साबळे अर्धनग्न होत आळंद महावितरण कार्यालय गाठले. कनिष्ठ अभियंता कडूबा काळे यांच्या दालनात ठिय्या दिला. 4 वाजेपर्यंत ट्रान्सफार्मर मिळालेच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या आंदोलनाचा यापूर्वीचा अनुभव माहिती असल्याने काळे यांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधून ट्रान्सफार्मर देण्याची मागणी केली. यानंतर यंत्रणा वेगाने हलली व दुपारपर्यंत गेवराई पायगा गावात दोन्ही ट्रान्सफार्मर हजर झाले. सायंकाळपर्यंत ते बसविण्याचे काम वेगाने सुरू होते. मंगेश साबळे यांच्या या आंदोलनाची परिसरात दिवसभर चर्चा होत होती. सरपंच झाल्यानंतर साबळे यांचे हे पहिलेच आंदोलन होते.
यावेळी साबळेंनी प्रथम ट्रान्सफार्मर द्या, तसेच परिसरात सडलेले विद्युत पोल, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रॉन्सफार्मर याची संपूर्ण दुरुस्ती करा, तरच आम्ही वीजबिल भरू, असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.