सातारा लोकसभा पोटनिवडणूक : सर्वात लक्षवेधी लढत

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होतेय. 

Updated: Oct 10, 2019, 12:08 AM IST
सातारा लोकसभा पोटनिवडणूक : सर्वात लक्षवेधी लढत title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होतेय. दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी, पदयात्रांवर भर दिलाय.  छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज असलेले उदयनराजे भोसले पाच महिन्यांतच पुन्हा मतदारांना सामोरे जातायत. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची सुनामी असताना ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर तब्बल १ लाख २६ हजार मतांनी निवडून आले..यावरून त्यांची लोकप्रियता मोजता येऊ शकेल.

आता ते पुन्हा एकदा कमळाच्या चिन्हावर जनतेला कौल लावत आहेत. समोर कुणीही असलं तरी आपणच निवडून येऊ, असा ठाम विश्वास उदयनराजेंना आहे.

मुरलेले राजकारणी श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवत राष्ट्रवादीनं चांगली खेळी खेळली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपानं थोडेफार हातपाय पसरले असले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. 

शिवेंद्रराजे वगळता मतदारसंघातला एकही आमदार उदयनराजेंच्या मदतीला नाही. कराड आणि पाटणमधून पाटलांना चांगली मतं मिळू शकतात. राजेंनी शरद पवारांची साथ सोडल्यानं पक्षाला सहानुभूती मिळू शकते. 

ही लढत दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केलीये. त्यामुळे विधानसभेसोबतच या लोकसभा मतदारसंघाकडेही राज्याचं लक्ष असेल. 

श्रीनिवास पाटील यांचा अनुभव आणि राष्ट्रवादीचा भक्कम पाया यामुळे उदयनराजेंना ही निवडणूक आधीएवढी सोपी जाणार नाही.