Sharad Pawar On NCP Party Symbol and Name: बारामतीमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी आणि कामगार मेळाव्यामध्ये शरद पवार यांनी पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी होलसेल चोरी झाली असं म्हणत शरद पवारांनी पक्षाचं नाव, चिन्ह आणि झेंडा सारं काही गेल्याचं उपस्थित कामगार आणि शेतकऱ्यांना सांगितलं. तसेच यंदाच्या निवडणुकीमध्ये चिन्ह तुतारी असून तुम्ही ते लोकांपर्यंत घेऊन जावं असं आवाहनही केलं.
"आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आता गंमत झाली. पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता सगळ्या देशाला माहीत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला? हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले, त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली. ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने. झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली. त्यामुळं काही लोक नाराज झाले," असं शरद पवार पक्षावरुन सुरु असलेल्या वादाबद्दल म्हणाले.
"नाराज झालेल्यांना मी म्हटलं नाराज व्हायचं नाही. गेले ते गेले! आपण नवीन उभे करू. हा अधिकार लोकांनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. नवीन पक्ष काढू. काही नसताना पक्ष काढला, तर पक्ष नुसता काढला नाही तर राज्य हातामध्ये घेतलं. अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राच्या मंत्रीमंडळात घेतलं. नवनवीन धोरणं घेतली. महिलांसाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना बापाच्या प्रॉपर्टीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टीत संधी दिली. त्याचं कारण, घर सुधारलं पाहिजे आणि त्यासाठी सत्ता वापरली गेली. हा निर्णय घेणारा जो पक्ष होता, तो पक्ष चोरीला गेला. तर नवीन उभा करू. एका दिवशी आपल्या घरात सुध्दा चोरी होते, म्हणून आपण घर चालवणं बंद करतो का?" असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> '..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'
आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर बसवतात, वसूल करतात. त्या वसुलीतून १०० रुपये आले तर त्यातले ६ रुपये खिशात टाकतात आणि सांगतात तुमच्या खिशात मी पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. ही गॅरंटी कशी? वसूल करायचे १०० आणि ६ परत द्यायचे. १०० वसूल करायची गॅरंटी… pic.twitter.com/Rfx92o1rlK
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 22, 2024
"पुन्हा एकदा उभं राहू, त्याच पध्दतीनं आम्ही आज हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, कार्यक्रम जुना हा घेऊन पुढे आलेलो आहोत. नेहमीची खूण आहे ती आता गेली, आता तुतारी आली. शिवछत्रपती ज्यावेळेला संघर्षाने जातात त्यावेळेला सन्मानाने लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी याच तुतारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्रात झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या परिवर्तनाची तुतारी वाजवायची आहे. त्यासाठी ही खूण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोकांनी करावं," असं आवाहन शरद पवारांनी केलं.