मोठी बातमी: अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

Updated: Sep 25, 2020, 12:51 PM IST
मोठी बातमी: अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. अहमदनगर महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या सभापती पदासाठीच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. युगराज घाडे यांनी शिवसेनेतर्फे स्थायी समितीच्या सभापती पदासाठी अर्ज भरला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या तीन पक्षात चर्चा झाल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनोज खोतकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर जिल्ह्यात यापुढे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र काम करण्याची सुरुवात स्थायी समितीच्या निवडणुकीपासून झाल्याची चर्चा आहे.

 

याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला, असेही संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी चर्चा केली होती. तसेच शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही एकमेकांशी सल्लामसलत केली होती. या सगळ्यात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत दोन्ही पक्षांना एकत्र आणले होते.  

काय होता वाद?
जुलै महिन्यात पारनेर नगरपंचायतीमधील  शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता. 

यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड दुखावले गेले होते. सत्तेत एकत्र असताना शिवसेनेला शह देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न त्यांना पटला नव्हता. त्यामुळेच उद्धव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत सर्व नगरसेवकांना शिवसेनेत परत पाठवा, असा खास निरोप अजित पवार यांना पाठवला होता. अखेर अजित पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली होती.