जळगाव : युती होवो ना होवो शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसैनिकांचा विरोधच असेल. असं वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. प्रारब्ध असेल तर आदित्य मुख्यमंत्री होणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगावमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. सैन्य हे आदेशाची वाट पाहत आहेत.
पाहा काय बोलले गुलाबराव पाटील
आता खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या सहनशिलतेची परीक्षा सुरू आहे. २५ वर्षे मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेनं भाजपला आपल्यामागे फरफटत नेत दुय्यम वागणूक दिली होती. आता परिस्थिती नेमकी उलटी झाली असून या बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजप उचलत आहे. तर शिवसेना नमतं घेत आहे.
कमळाबाई म्हणून बाळासाहेबांनी जिची संभावना केली, तीच कमळाबाई आता राज्यात शिवसेनेचा मोठा भाऊ झाली आहे. २०१४ पर्यंत २५ वर्षांच्या युतीत आवाज असायचा तो फक्त शिवसेनेचाच. दिल्लीतून भाजपचा वरिष्ठ नेता आला आणि मातोश्रीवर गेला नाही, असं कधी व्हायचं नाही.
२०१४ नंतर शिवसेनेच्या नशिबाचे फासे उलटे पडाय़ला सुरुवात झाली. आता भाजपला बदला घ्यायचा आहे. आता भाजपला सूत्र हवं आहे. भाजपसाठी १७१ आणि शिवसेनेसाठी ११७. पण शिवसेना ११७ पर्यंत खाली यायला तयार नाही. शिवसेनेतल्या काही जणांनी ऐकलं असतं तर सत्तेपेक्षा विरोधात बसलो असतो, अशी सल आता शिवसेना नेते बोलून दाखवत आहेत.