कल्याण : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असताना कल्याण पंचायत समिती सभापती निवडणुकीत मात्र शिवसेनेने राष्ट्रवादीला बाजूला सारत चक्क भाजपची हातमिळवणी करत सभापती आणि उपसभापती पदावर बाजी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडपने आपली नाराजी व्यक्त केली.
कल्याण पंचायत समितीत भाजपकडे 5, शिवसेनेकडे 4, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 असे पक्षीय बलाबल असून 12 सदस्यामधून सभापती आणि उपसभापती पदाची आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीसोबत युती करत राज्यातील आणि जिल्ह्यातील सत्तेचा कित्ता गिरवेल अशी शक्यता होती. मात्र भाजपच्या मदतीने सेनेच्या अनिता वाकचौरे यांनी सभापती पदासाठी तर शिवसेनेचेच रमेश बांगर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. या दोघानाही प्रत्येकी 7 मते मिळाल्यामुळे त्यांचा सत्तेचा मार्ग सुकर झाला. राष्ट्रवादीला मात्र सत्तेपासून दूर राहावे लागले.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत एकच गोंधळ घातला. सभापती, उसभापती पद वाटपाबाबत ठरले होते. मात्र आज अचानक भाजपला हाताशी धरून सत्ता स्थपन करण्यात आली. आर्थिक व्यवहारासाठी गद्दारी केली, शिवसेना पदाधिकऱ्यांनी आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.
शिवसेना इच्छुक उमेदवारांना डावलण्यात आल्याने त्यांनी देखील संताप व्यक्त करत आम्हाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे.
पंचायत समितीत सत्ता हातात ठेवण्यासाठी भाजपकडून शिवसेनेच्या दोन सदस्यांना फोडत त्यांच्याच गळ्यात सभापती, उपसभापती पदाची माळ घालण्यात आल्याने नक्की कोणी कोणाचा गेम केला हीच चर्चा बरसणाऱ्या पावसाबरोबर कल्याण-डोंबिवलीत रंगली होती.