Ashish Deshmukh Show Cause Notice : नागपुरातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते सातत्यानं गंभीर आरोप करत आहेत. तसेच काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची दुसरी संयुक्त जाहीर सभा नागपुरात 16 एप्रिलला होत आहे. त्याआधीच काँग्रेसमधील अंतर्गतवाद चव्हाट्यावरआला आहे. राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्यावर टीका करणारे माजी आमदार अशीष देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पटोले हे महाविकास आघाडीत खोडा टाकण्याचे काम करत असून, त्याला खोके जबाबदार आहे. तसेच पटोले वेगळी चूल मांडण्याचे हे संकेत असल्याचे आशिष देशमुख म्हटले आहे. आपण राष्ट्रवादीत जाणार नसून, कारखान्याच्या कामासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचंही स्पष्टीकरण दिले आहे.
आशीष देशमुख सातत्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करत आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, नाना पटोले यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असतात, असे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. सातत्याने पक्षविरोधी विधाने करणाऱ्या देशमुखांची वरिष्ठ नेते योग्य ती दखल घेतील, असे सांगून लोंढे यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरीकडे माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच काँग्रेस सोडली, असा खळबळजनक खुलासा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये आता सोनिया गांधी यांचे काहीही चालत नाही. त्यांचं चाललं असतं तर काँग्रेस सोडली नसती असा दावाही आझाद यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताविषयी दिलेल्या वादग्रस्त मुलाखतीवरही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसमध्ये पहिल्या थरात वावरणारे नेते म्हणून गुलाम नबी आझाद यांची ओळख होती. राज्यसभा खासदार तसेच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्रीही होते