सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे. त्यामुळं जिल्ह्यात सर्व व्यवहार ठप्प आहेत. एसटी वाहतूक बंद असल्याने ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वस्तीच्या बसेस माघारी परतल्या आहेत. कसाल-मालवण राज्य मार्गावर सुकळवाड, सावरवाड येथे तीन ठिकाणी पहाटे अज्ञातांनी झाडाच्या फांद्या तोडून रस्त्यावर टाकल्यामुळे मुंबई येथून येणाऱ्या बसेस तसेच दूध वाहतूक, वर्तमानपत्रे घेऊन येणाऱ्या गाड्या अडकल्या होत्या.
पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि ग्रामस्थ यांनी मिळून रस्त्यावरील झाडाच्या फांद्या बाजुला करून मार्ग मोकळा केला.
चौके बाजारपेठ तिठा येथे अज्ञातांनी टायर जाळण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील पोलिसांना पाहताच टायर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञातांनी तेथून धाव घेतली. टायर बाजूला करून पोलिसांनी रस्ता मोकळा केला. सिंधुदुर्ग बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.