सोलापूर : महाजनादेश यात्रेच्या सांगता सोहळ्यासाठी भाजपकडून सोलापूर शहरात अमित शहा यांचे फलक लावण्यात आले होते. त्यावर सरदार अमित शहा अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलेला होता. हे फलक शहरात बऱ्याच ठिकाणी लावण्यात आले होते. मात्र हे सगळे फलक आता हटवण्यात आले आहेत. भाजपाच्या काही वरीष्ठ नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळेच सरदार लिहिलेली हे सगळे फलक हटवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता सोलापूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप कार्यक्रमावर पावसाचं सावट आहे, खरंतर सोलापुरात १० दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य आनंदी आहेत, मात्र महाजनादेश यात्रेचे आयोजक मात्र संकटात सापडले आहेत. ज्या मैदानावर महाजनादेश यात्रेची सांगता आहे, त्या मैदानावर सध्या पूर्णतः चिखलाचं साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. अगदी मैदानावर चालणं सुद्धा कठीण झालं आहे.
आयोजकांकडून, प्रशासनाकडून चिखलावर खडी, वाळू टाकून मैदान सुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र पुन्हा पाऊस आला तर ही सभा संकटात येऊ शकते असं चित्र आहे.