भाजपला धक्का; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात

जयसिध्देश्ववर स्वामी यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याने समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले.

Updated: Feb 24, 2020, 04:18 PM IST
भाजपला धक्का; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात title=

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर स्वामी यांची खासदारकी धोक्यात आली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. त्यांचा जातीचा दाखल बनावट असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. 

 ...म्हणून मतदानानंतर भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी काही न बोलताच निघून गेले
 
जात पडताळणी समितीने गेल्या आठवड्यात याबाबत सुनावणी पूर्ण केली होती. जयसिध्देश्ववर स्वामी यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याने समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले.लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला होता. 

भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा सापडले वादात

मात्र, या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर स्वामींना सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. चौकशीअंती या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे. दरम्यान, याविरोधात जयसिद्धेश्वर स्वामी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे समजते.