Dadasaheb Bhagat Success Story: 'शार्क टॅंक इंडिया' शोमध्ये अनेक व्यावयसिकांना पुढे जाण्यासाठी भांडवले मिळते आणि पाहणाऱ्या लाखोंना त्यातून प्रेरणा मिळते. छोट्याशा, गरीब कुटुंबातून येऊन स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्यांमध्ये मराठी नावे देखील दिवसेंदिवस वाढताना दिसतायत, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. दादासाहेब भगत हे यातीलच एक सध्याचे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले नाव आहे. दादासाहेब भगत या तरुणाची कथा त्रयस्त माणसाला फिल्मी वाटू शकते. पण त्याच्या आयुष्यात घडलेली कहाणी प्रेरणादायी अशी आहे.
संघर्ष दादासाहेबच्या पाचवीला पुजलेला होता. छोट्याशा गावात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला 80 रुपये रोजंदारीचे काम मिळाले. हे सांगताना सुरुवातीला तो थांबला, त्याचा घसा सुकला होता. पण शार्कनी त्याला धीर दिला आणि यानंतर दादासाहेबने स्वत:च्या व्यवसायाबद्दल सांगयला सुरुवात केली. दहावी पास दादासाहेब एकेकाळी शिपाई म्हणून काम करत होता. इन्फोसिसच्या ऑफिसमधला सफाई कामगार एक दिवशी स्वतःची कंपनी सुरु करेल असे कोणालाही वाटले नव्हते. शार्क टँक इंडिया सीझन 3 च्या मंचावर दादासाहेबचे पीच ऐकून सर्व शार्क भावूक झाले.
दादासाहेबला 80 रुपये कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तो रोजंदारीवर माती वाहक म्हणून काम करायचा. कधी कधी तो कार्यालयात झाडू मारण्याचे काम करु लागला. बीडमध्ये 1994 मध्ये दादासाहेब भगतचा जन्म झाला. त्याचे आई-वडील मजूर म्हणून काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. आर्थिक बाबतीत कुटुंबाला हातभार लावण्याशिवाय दादासाहेबकडे पर्याय नव्हता. त्यामुळे वयाच्या 14 व्या वर्षापासून त्याने मोलमजुरी करायला सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले. विहीर खोदणे आणि माती वाहून नेण्याचे काम करण्यासाठी त्याला दररोज 80 रुपये मिळत.
रोजंदारीचे काम करत असला तरी दादासाहेबला शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. शिक्षणानेच आपण आपले नशीब बदलू शकतेयावर तो ठाम होता. 2009 मध्ये दादासाहेबला चेन्नईमध्ये इन्फोसिस कंपनीत नोकरी मिळाली. कर्मचाऱ्यांना चहा-पाणी पुरविण्यापासून ते ऑफिसमध्ये झाडू मारणे, लादी पुसणे, साफसफाई करणे अशी काम तो करत होता. आपण शिपाई म्हणून काम करतोय हे दादासाहेबने घरच्यांना सांगितले नव्हते. इन्फोसिसमधील या नोकरीचे त्याला दरमहा 9 हजार मिळत होते. इन्फोसिस कंपनीमध्ये कॉम्प्युटरवर काम करुन लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचे त्याने पाहिले. आपणदेखील कॉम्प्युटर शिकूया,असे त्याला वाटू लागले. त्याने संगणक शिकायला सुरुवात केली.
बघता बघता दादासाहेबने तंत्रज्ञानाशी संबंधित तपशील शिकून घेतले. तो रात्री काम करायचा आणि दिवसा कोडिंग, ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा अभ्यास करायचा. नोकरीसोबतच त्याने सी प्लस प्लस आणि पायथॉनचा कोर्स केला. तो ग्राफिक्स, व्हीएफएक्स, मोशन ग्राफिक्स शिकला. या शिक्षणावर त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली. पण परिस्थितीने अचानक वेगळ वळण घेतलं. दादासाहेबचा अचानक अपघात झाला. त्यामुळे सर्वकाही सोडून त्याला आपल्या गावी परतावे लागले.
मित्राकडून भाड्याने लॅपटॉप घेऊन दादासाहेब गावी गेला होता. लॅपटॉपवरुन तो टेम्प्लेट बनवत असे. येथून त्याला अनोख्या व्यवसायाची कल्पना सुचली. त्याने आपले टेम्पलेट्स ऑनलाइन विकण्यास सुरुवात केली. दादासाहेबने स्वतःच्या कंपनीचे डिझाइन टेम्पलेट बनवले आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मचे ग्राफिकल टेम्पलेट्स विकण्यास सुरुवात केली. दादासाहेबने नाइन्थमोशन, डुग्राफीक्स नावाच्या दोन कंपन्यांची स्थापना केली. आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन 10 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शार्क टँकमध्ये दादासाहेबने आपल्या कंपनीच्या 2.5 टक्के इक्विटीच्या बदल्यात 1 कोटी रुपयांची मागणी केली. बोटचे सहसंस्थापक अमन गुप्ता यांनी त्यांच्या कंपनीतील 10 टक्के समभागाच्या बदल्यात 1 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला. छोट्याशा गावातून येऊन कोट्यावधीचा व्यवसाय संभाळणे अशक्यप्राय गोष्ट आहे. नवे शिकण्याची जिद्द, सातत्य, मेहनत यामुळे दादासाहेब सारखे तरुण स्वत:चा करोडोचा व्यवसाय उभारताता आणि इतरांसाठी प्रेरणादायी कहाणी ठरतात.