विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नाही - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

Updated: Apr 16, 2019, 06:52 PM IST
विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नाही - सुशीलकुमार शिंदे title=

मुंबई : यापुढे आपण कोणतीही विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची भावनिक घोषणा माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जातीयतेचा आरोप करीत बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाला तिलांजली दिल्याची टीका त्यांनी केली आहे. शिवाय ते भाजपचेच पिल्लू असल्याचेही आरोप त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केले आहेत.

याआधी सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीचा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शनिवारी सकाळी सोलापुरात बालाजी सरोवर हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची भेट झाली. सोलापूरमधल्या बालाजी सरोवर हॉटेल इथं प्रकाश आंबेडकर थांबले होते. या दरम्यान आंबेडकर थाबलेल्या हॉटेलवर काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर ही थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी शिंदे हॉटेल बालाजी सरोवरामध्ये आले. याठिकाणी प्रकाश आंबेडकर असल्याचं कळल्यानंतर शिंदेंनी त्यांची देखील भेट घेतली.
  
उल्लेखनीय म्हणजे, राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतरही पक्षाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीतील लढाईसाठी उभे राहिलेल्या सुशील कुमार शिंदेंपुढे प्रकाश आंबेडकरांमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. २०१४ सालीही लोकसभा निवडणुकीत ७८ वर्षीय सुशील कुमार शिंदे यांना जवळपास दीड लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती.

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदार संघासोबतच सोलापूर मतदार संघातूनही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एआयएमआयएम'सोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र काँग्रेसला धक्का दिलाय. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. 

काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना टक्कर देण्यासाठी भाजपनं जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मैदानात उतरवलं आहे.